लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे कार्यरत असताना ३५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहाथ पकडला गेलेला तहसीलदार सचिन जैस्वाल यांच्याकडे गडचिरोली तहसीलदार पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाने डाव्या व प्रगतिशील पक्षांमध्ये संताप उसळला आहे. शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि आझाद समाज पक्षाने या नियुक्तीला तीव्र आक्षेप घेत तातडीने कार्यभार काढून घेण्याची मागणी केली असून अन्यथा ठिय्या आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, माकप जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार आणि आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले की, गडचिरोलीचे माजी तहसीलदार संतोष आष्टीकर यांची बदली झाल्यानंतर रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार ८ ऑगस्ट रोजी सचिन जैस्वाल यांच्याकडे सोपविण्यात आला. मात्र, जैस्वाल हे भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांत सापडलेले अधिकारी आहेत. १२ एप्रिल २०२४ रोजी सिंदखेड राजा येथे रेती तस्करांकडून लाच स्वीकारताना ते रंगेहाथ पकडले गेले होते. त्यावेळी त्यांच्या निवासस्थानी तब्बल ३७ लाख ५२ हजार १८० रुपये, तर परभणीतील घरातून ९ लाख ४० हजार रुपये रोख अशी मिळून ४६ लाख ९२ हजार १८० रुपयांची बेहिशोबी संपत्ती जप्त करण्यात आली होती.
अशा पार्श्वभूमीवर भ्रष्टाचाराच्या कलंकाने माखलेल्या अधिकाऱ्याला जिल्ह्याच्या मुख्यालयातील महत्वाचे पद देणे म्हणजे रेती तस्करीला आमंत्रण देण्यासारखे असल्याची तीव्र टीका नेत्यांनी केली. “भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या हाती जिल्ह्याचा कारभार देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेल्या गडचिरोलीला कसा काय प्रगतीपथावर नेणार?” असा सवाल उपस्थित करत, सचिन जैस्वाल यांच्याकडून अतिरिक्त कार्यभार तातडीने काढून न घेतल्यास तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.