लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
छ. संभाजीनगर / नांदेड : जातीच्या विषारी सीमांनी पुन्हा एक निर्दयी मृत्यूला जन्म दिला. दलित तरुण सक्षम ताटे याची मुलीच्या कुटुंबीयांनी गोळी झाडून आणि फरशीने डोके ठेचून केलेली हत्या प्रकरणात धक्कादायक कलाटणी समोर आली आहे. आपल्या प्रियकराला गमावलेल्या प्रेयसी आंचलने मृत सक्षमच्या देहाला कुंकू लावून त्याच्याशी प्रतिकात्मक लग्न करण्याचा निर्णय घेतला असून ती आता त्याच्याच घरी मुक्कामी आहे. “सक्षम माझ्या प्रेमात जिंकला आहे,” असे हृदय पिळवटून टाकणारे शब्द तिने माध्यमांसमोर व्यक्त केले.
घटनेचा उगम एकच — जातीबाहेर प्रेम. सक्षम आणि आंचल विवाहासाठी तयार होते. मात्र मुलगी दलित तरुणाशी लग्न करणार असल्याचे समजल्यानंतर कुटुंबीय संतापले. सक्षमला आंचलपासून दूर राहण्याचे आदेश देण्यात आले, तिच्यावर इतरांशी बोलण्याचा तगादा लावण्यात आला. पण प्रेम थांबले नाही. अखेर कट रचून सक्षमला गाठण्यात आले आणि त्याच्या डोक्यात गोळी मारून तसेच फरशीने डोके ठेचून अत्यंत क्रौर्याने हत्या करण्यात आली.
या प्रकरणी गजानन मामीडवार, साहिल मामीडवार, सोमेश लाखे, वेदांत कुंदेकर यांच्यासह एकूण नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता सर्वांना आठ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. हत्येतील प्रत्येक पुरावा गोळा करण्यासाठी पोलिसांकडून तपास अधिक गतीने सुरू आहे.
दरम्यान, आंचल मात्र आरोपींपासून पूर्णपणे अलिप्त राहून सक्षमच्या घरीच राहण्याचा निर्णय घेतला आहे. प्रियकरावर झालेल्या जातीय सूडातून जन्मलेल्या खुनामुळे राज्यात तीव्र संतापाची लाट असून, ही घटना पुन्हा एकदा समाजातील जातभेदाच्या क्रूर वास्तवाला आरपार भेदून दाखवते.