गडचिरोली जिल्हा रहिवासी वगळता उर्वरित महाराष्ट्रातील उमेदवार पोलीस शिपाई / चालक पोलीस शिपाई भरतीकरीता पात्र नाहीत

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. ३ जानेवारी: महाराष्ट्र शासनाने राज्यातील संपूर्ण जिल्ह्यासाठी जाहीर केलेल्या १४००० पदांच्या पोलीस भरती प्रक्रिया ही महाराष्ट्रातील विविध ठिकाणी चालु झालेली असुन, गडचिरोली पोलीस दलातर्फे राबविण्यात येणाऱ्या ३४८ पोलीस शिपाई व १६० चालक पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया ही दिनांक ०२ जानेवारी २०२३ रोजी पासुन गडचिरोली पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर चालु झालेली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या पोलीस शिपाई या पदाकरीता शासन निर्णय क्र. आरसीटी१५१७/सी.आर.२४१/ पोल – ५ अ, तसेच चालक पोलीस शिपाई या पदाकरीता शासन निर्णय क्र. एमटीएस०३१९/प्र.क्र.२४५(भाग-१)/पोल ४ या संदर्भीय अधिसुचनेनुसार, गडचिरोली जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या –उमेदवारांनाच गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीमध्ये भाग घेता येईल.

सदर उमेदवारांना प्रचलित नियमानुसार संबंधीत तहसिलदार यांनी दिलेला वास्तव्याचा दाखला (Residential certificate) जोडणे आवश्यक राहील, असे नमूद केलेले आहे. तसेच गडचिरोली पोलीस दलाने दि. ०५/११/२०२२ रोजी दिलेल्या जाहीरातीमध्ये स्पष्टपणे नमुद केले होते की, महाराष्ट्र शासन, गृह विभाग, अधिसूचना दिनांक २३ सप्टेंबर, २०२२ अन्वये गडचिरोली जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या उमेदवारांनाच गडचिरोली जिल्हा पोलीस भरती मध्ये भाग घेता येईल.

सदर उमेदवारांना प्रचलित नियमानुसार संबंधीत तहसिलदार यांनी दिलेला वास्तव्याचा दाखला (Residential certificate) जोडणे आवश्यक आहे. या आधारावरच फक्त गडचिरोली जिल्ह्यातील रहीवासी उमेदवारच सदर भरतीकरिता पात्र आहेत.

त्यामुळे उर्वरित जिल्ह्यातील उमेदवारांना कळविण्यात येते की, आपण गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई या पदाकरीता पात्र नाहीत. तरी आपण भरतीकरीता येऊ नये असे आवाहन  पोलीस अधीक्षक, गडचिरोली नीलोत्पल यांनी केले आहे.