‘हेल्पिंग हँड’चा विद्यार्थ्यांना नवा मार्ग — सोडे आश्रमशाळेत करिअर दिशा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, दि. २६ : धानोरा तालुक्यातील सोडे येथील आश्रम शाळेत हेल्पिंग हँड बहुउद्देशीय संस्थातर्फे दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेले करिअर मार्गदर्शन सत्र आज उत्साहात पार पडले. ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याला दिशा देणारा हा उपक्रम, वाढत्या स्पर्धेच्या युगात माहितीअभावी निर्माण होणाऱ्या संभ्रमातून विद्यार्थ्यांना मुक्त करणारा ठरला.

सत्रात उच्च शिक्षणातील विविध प्रवाह, औद्योगिक प्रशिक्षण, तांत्रिक अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास, व्यक्तिमत्त्व घडविणे आणि करिअर निवडीतील निर्णायक बाबी यासंदर्भात तज्ञांनी स्पष्ट, सुटसुटीत आणि व्यावहारिक मार्गदर्शन केले. “करिअर ही केवळ वाटचाल नसून योग्य तयारी आणि सातत्याचा पाया आहे,” असा संदेश मान्यवरांनी विद्यार्थ्यांना दिला.

या कार्यक्रमात संस्थेच्या अध्यक्षा पायल माशाखेत्री, आयटीआयचे निदेशक शुभम देशपांडे, तसेच संगळे सर आणि आशीष माशाखेत्री सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी लक्ष्यनिर्धारण, वेळेचे व्यवस्थापन आणि योग्य करिअर निवड यांसंबंधी सांगितलेली मार्गदर्शक तत्त्वे आत्मसात करून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

हेल्पिंग हँड बहुउद्देशीय संस्था जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये मोफत करिअर मार्गदर्शन उपक्रम राबवित असून विद्यार्थी जागरूकता, शैक्षणिक प्रगती आणि कौशल्याभिमुखता वाढविण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांसमोर शिक्षण व करिअरची नवी क्षितिजे खुली होत असल्याचे शिक्षकांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेतील शिक्षकांनी केले. सत्रानंतर विद्यार्थ्यांमध्ये करिअरविषयी नव्या दृष्टिकोनाची जागरूकता, आत्मविश्वास आणि उद्दिष्टपूर्तीची प्रेरणा स्पष्टपणे जाणवत होती.

हे देखील वाचा,

शिवराजपूर गट ग्रापंचे तिन्ही गावे दारू विक्रीमुक्त -मुक्तिपथ व लोकसहभागातून यश

आशीष माशाखेत्रीकरिअर मार्गदर्शन
Comments (0)
Add Comment