बांधकाम कामगार योजनांत बनावट कागदपत्र प्रकरण उघड! चामोर्शीत गुन्हा दाखल, अधिक चौकशी सुरू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, ८ जुलै २०२५ : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांतर्गत ९० दिवसांच्या कामाचे बनावट प्रमाणपत्र तयार करून शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी रामपूर (ता. चामोर्शी) येथील एका इसमाविरुद्ध चामोर्शी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शासनाच्या कल्याणकारी योजनांत बोगस लाभार्थी व दलालांचे वाढते प्रस्थ लक्षात घेता, अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने दक्षता पथक समितीची स्थापना केली आहे. या समितीत गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यातील कामगार विभागातील अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते.

या पथकाने ४ जुलै २०२५ रोजी चामोर्शी नगर परिषद कार्यालयाची तपासणी केली. सदर व्यक्तीने सादर केलेल्या ९० दिवसांच्या कामाचे प्रमाणपत्र खरे आहे का, याची पडताळणी केली असता संबंधित कार्यालयाने स्पष्ट केले की, असे कोणतेही प्रमाणपत्र त्यांच्या कार्यालयातून निर्गमित करण्यात आलेले नाही. याबाबतचा अधिकृत लेखी खुलासा मुख्याधिकारी, नगर पंचायत चामोर्शी यांनी पथकास दिला आहे.

त्यानंतर शासकीय कामगार अधिकारी सीमा शिंदे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत, चामोर्शी पोलीस ठाण्यात संबंधित इसमाविरुद्ध कायदेशीर तक्रार दाखल केली. याअंतर्गत फसवणूक, खोटी कागदपत्र सादर करणे आणि शासन यंत्रणेची फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

कामगार कल्याणकारी योजनांमध्ये पारदर्शकता व शिस्त राखण्यासाठी शासन स्तरावर बोगस लाभार्थ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. “अशा प्रकारच्या बोगस कृत्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू असून, इतर संशयास्पद प्रकरणांचीही चौकशी सुरू आहे,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले.