लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
मुलचेरा : मुलचेरा तालुक्यातील बंदुकपल्ली येथे अवैध दारूविक्री सुरू असल्याची माहिती मिळताच पोलीस, मुक्तीपथ व गाव संघटनेने संयुक्त कृती करीत एका विक्रेत्याचा 3 ड्रम मोहफुलाचा सडवा नष्ट करण्यासोबतच 30 लिटर दारू जप्त केली. याप्रकरणी संबंधित विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलचेरा तालुका मुख्यालयापासून 8 किमी अंतरावर असलेल्या बंदुकपल्ली गावात मागील 8 वर्षांपासून अवैध दारूविक्री बंद आहे. मुलचेरा पोलिस व गावसंघटनेच्या पुढाकारातून सदर परिसरातील बहुतांश गावातून अवैध दारू हद्दपार सुद्धा झाली आहे. परंतु, बंदुकपल्ली येथे या काही दिवसात चार जणांनी अवैध दरुविक्री केल्याची माहिती समोर आली. हे कळताच गावात पुन्हा पूर्वी प्रमाणे दारूविक्री सुरू होऊ नये यासाठी मुक्तीपथ गाव संघटनेने आपल्या गावाला कायम दारूमुक्त करण्यासाठी पोलिस व मुक्तिपथ तालुका चमू यांना बोलावून विक्रेत्यावर कारवाई केली आहे.
गावातील एका विक्रेत्याने शेतशिवरात हातभट्टी लावली असल्याची गुप्त माहिती मिळाली. प्राप्त माहितीनुसार मुलचेरा पोलीस, मुक्तिपथ व गाव संघटनेने संयुक्त कृती करीत शोधमोहीम राबवली. यावेळी घटनास्थळी 3 ड्रम मोहफुलाचा सडवा, दारू गाळण्याचे साहित्य व 30 लिटर दारू असा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी संबंधित विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे, तालुका मुख्यालयासह विविध गावात सुरू असलेली अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी पोलिसांनी यशस्वी प्रयत्न सुरू केले आहे. यावेळी मुक्तिपथ तालुका संघटक रुपेश अंबादे उपस्थित होते.