सुट्टीच्या दिवशीही जात पडताळणी समिती सक्रिय नगरपालिका निवडणुकांपूर्वी उमेदवारांसाठी गडचिरोलीत विशेष सुविधा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली दि. १५ नोव्हेंबर — राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका–२०२५ जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यात राखीव जागांवर निवडणूक लढविण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांकडून जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्जांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नामनिर्देशनाची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर २०२५ जवळ आल्याने समितीकडे होणारी गर्दीही वाढल्याचे चित्र दिसत आहे.

अर्जदारांची कोणतीही गैरसोय होऊ नये आणि पडताळणी प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोली यांनी विशेष निर्णय घेतला आहे. त्यानुसार १५ नोव्हेंबर (शनिवार) आणि १६ नोव्हेंबर (रविवार) या सुट्टीच्या दिवशीही समितीचे कार्यालय विशेषतः खुले ठेवण्यात येणार आहे.

समितीमार्फत आवश्यक कागदपत्र तपासणी, मार्गदर्शन आणि अर्ज स्वीकृती सुट्टीच्या दिवशीही नियमितपणे केली जाणार असून, उमेदवारांना त्यांच्या वेळेनुसार सेवा मिळावी हा समितीचा हेतू आहे.

निवडणूक कार्यक्रमातील वेळापत्रक लक्षात घेता, सर्व इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह तात्काळ अर्ज दाखल करावेत, असे आवाहन संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोली यांनी केले आहे.

Comments (0)
Add Comment