बिबट्याला 48 तासात पकडा, अन्यथा नाईलाजाने गोळ्या घालू

विजय वडेट्टीवारांचा वनविभागाला इशारा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, 10 डिसेंबर: बिबट्याला 48 तासाच्या आत पकडा, नाही तर बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश नाईलाजाने सरकारकडून दिले जातील, असा इशारा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी वनविभागाला दिला.

ब्रम्हपुरी तालुक्यात एका आठवड्यात दोन जणांचा बिबट्याने बळी घेतला आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांची वडेट्टीवार यांनी भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी शासनाकडून दिल्या जाणार्‍या मदतीचा धनादेश मृतकांच्या कुटुंबीयांना दिला.

चिचगाव येथे गेल्या एका आठवड्यात दोन महिलांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. यापैकी पहिली घटना 3 डिसेंबर रोजी घडली. या घटनेत तारा ठाकरे (55) ही महिला सकाळी गावाबाहेर शेण टाकायला गेली असता बिबट्याने हल्ला केल्याने यात तिचा मृत्यू झाला. दुसरी घटना 7 डिसेंबर रोजी घडली. या घटनेत सायत्रा ठेंगरी (60) या महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही महिला सरपण गोळा करायला सायंकाळी घरामागे गेली होती.

बिबट्याच्या हल्ल्यामुळे गावकरी चिंतेत आहेत. घराबाहेर पडावे की पडू नये, असा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. परंतु, शेतीच्या कामांसाठी, उदरनिर्वाहासाठी घराबाहेर पडणे गरजेचे आहे. अशात जीव मुठीत धरुन गावकरी घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांनी चिचगाव येथे जाऊन ठाकरे आणि ठेंगरी या दोन्ही मृत महिलांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. दरम्यान, वडेट्टीवार यांनी गावकरी आणि वनविभागाच्या अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली तसेच गावकर्‍यांना आश्वस्त केले.