पेसा क्षेत्रातील मानधन तत्वावर प्रवर्गनिहाय तलाठी निवड व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध

7 ऑक्टोबर रोजी नियोजन भवन येथे उमेदवारांच्या दस्तऐवजांची तपासणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपूर, दि.6 : अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) तलाठी संवर्गातील सरळसेवेची पदे मानधन तत्वावर भरण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या 5 ऑक्टोबर 2024 च्या पत्रान्वये परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील तलाठी पदांकरिता प्रसिद्ध केलेल्या गुणवत्ता यादीनुसार तलाठी प्रवर्गनिहाय निवड यादी व प्रतिक्षा यादी 6 ऑक्टोबर 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्या www.chanda.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवड व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची दस्तऐवज तपासणी ही सोमवार दि. 7 ऑक्टोबर 2024 रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, चंद्रपूर येथे सकाळी 10.30 वाजता करण्यात येणार आहे. त्यामुळे निवड / प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी पुढीलप्रमाणे दस्तऐवज स्व साक्षांकित प्रतीचे दोन संच घेऊन न चुकता तपासणीस्थळी उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा निवड समितीचे सचिव डी. एस. कुंभार यांनी केले आहे.

उमेदवारांच्या या दस्तऐवजांची होणार तपासणी : 1. अर्जातील नावाचा पुरावा (प्रवेश पत्र /ऑनलाइन अर्ज), 2. वयाचा पुरावा (जन्म तारखेचा पुरावा), 3. शैक्षणिक अर्हता (10 वी/12वी/ पदवी, इत्यादी पुरावा), 4. सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा (जातीचे प्रमाणपत्र), 5. जातवैधता प्रमाणपत्र, 6. अराखीव महिला, खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्याचा पुरावा, 7. अधिवास प्रमाणपत्र, 8. नावात बदल असल्यास त्याचा पुरावा, 9. संगणक प्रमाणपत्र, 10. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र, 11. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, 12. उमेदवाराचे आधारकार्ड / पॅन /कार्ड /निवडणूक ओळखपत्र/ वाहतूक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) यापैकी एक, 13. पेसा क्षेत्रातील प्रमाणपत्र.

Comments (0)
Add Comment