सर्व शाळा महाविद्यालयात सीसीटीव्ही आवश्यक

अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांचे निर्देश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली – बदलापूरसारखी दुदैवी घटना आपल्या जिल्ह्यात घडू नये यासाठी दक्षता घेणे आवश्यक असून जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी शाळा आणि महाविद्यालयात शासन नियमानुसार तातडीने सीसीटीव्ही लावण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी दिले आहेत.
जिल्हा परिषद कामकाजाचा आढावा नियोजन भवन येथे मंत्री डाॅ. आत्राम यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी संजय दैने, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, उपवनसंरक्षक पूनम पाटे, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

डॉ. आत्राम यांनी पुढे बोलताना शाळेच्या ५०० मिटर परिसरात पानटपऱ्यांना प्रतिबंध असून याबाबतच्या शासन निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.शाळेतील बालकांचे योग्य पोषण व्हावे म्हणून शासनाने पोषण आहार योजना सुरू केली आहे त्यांचेसाठी मिळालेले धान्य सूव्यवस्थित ठेवण्यात आले आहे का, त्याचा योग्य वापर होतो काय ,याबाबत केंद्रप्रमुख आणि शिक्षणाधिकारी यांनी विविध शाळांना नियमित भेटी देऊन तपासणी करण्याचेही मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले.
आरोग्य विभागाचा आढावा घेताना सर्व शासकीय रुग्णालयात स्वच्छतेकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे व त्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

अहेरी उपविभागात पूर परिस्थितीमुळे बंद असलेली बससेवा पुर्ववत सुरू करावी आणि शाळेच्या वेळेनुसारच बस सोडण्याची खबरदारी घ्यावी. गडचिरोली जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या मानव विकासच्या ५५ बस मागिल १ वर्षापासून मिळाल्या नाहीत, त्या तातडीने मिळण्याबाबत परिवहन विभागाने पाठपुरावा करावा, बांधकाम विभागाने रस्ते दुरुस्ती कामांची गंभीरपणे दखल घेऊन महत्त्वपूर्ण रस्ते लवकर पूर्ण करावे आदी सूचना त्यांनी दिल्या.

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांचा शासनावर विश्वास वाढत असून शासनाकडे त्यांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. अधिकाऱ्यांनी नागरिकांचे कामे तत्पर्तने पूर्ण करून नागरिकांचा विश्वास सार्थ ठरविण्याचे डॉ. आत्राम यांनी सांगितले.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मिळणारे पैसे त्यांनी काळजीपूर्वक खर्च करावे व गरजेच्या वेळी उपयोगी पडण्यासाठी ते बँकेतच जपून ठेवावे.

शासनाने सुरू केलेल्या जनकल्याणाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन मंत्री आत्राम यांनी केले.आयुषी सिंह यांनी सादरीकरणाद्वारे जिल्हा परिषदेच्या विविध कामांची माहिती दिली. जिल्हा परिषद अंतर्गत 580 पदांसाठी पदभरती सुरू आहे यातील 10 उमेदवारांना मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते आज नियुक्तीपत्र देण्यात आले.

बैठकीला रविंद्र वासेकर, लिलाधर भरडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी चेतन हीवंज, शिक्षणाधिकारी भुसे तसेच जिल्हा परिषदेचे विविध अधिकारी उपस्थित होते.

 

अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्रामजिल्हाधिकारी संजय दैने