लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, ३१ जुलै: जिल्ह्यात १ ऑगस्ट, २०२५ रोजी ‘महसूल दिन’ साजरा करण्यात येणार असून, याच दिवसापासून ७ ऑगस्ट, २०२५ पर्यंत ‘महसूल सप्ताह-२०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सर्व उपविभागीय, तहसिल व तलाठी कार्यालयामार्फत समाजाच्या विविध घटकांतील नागरिकांसाठी विविध विशेष मोहिमा, कार्यक्रम, उपक्रम, शिबिरे आणि महसूल अदालती आयोजित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महसूल यंत्रणेला दिल्या आहेत.
महसूल सप्ताह राबविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी आज दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व महसूल यंत्रणेला सूचना दिल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नमन गोयल व रणजित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, तसेच दूरद्ष्य प्रणालीद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, तलाठी व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी सांगितले की महसूल दिनाचा मुख्य उद्देश जिल्हास्तरीय महसूली कामे वेळेत पूर्ण करणाऱ्या, अभिलेख अद्ययावत करणाऱ्या, वसुलीच्या नोटीस पाठवणाऱ्या, मोजणी करणाऱ्या आणि अपील प्रकरणांची चौकशी करणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांचा सत्कार करणे तसेच महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्यांचा गौरव करणे यासोबतच महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवणे आहे.
या सप्ताहादरम्यान महसूल विभागाकडून दिल्या जाणाऱ्या सेवा आणि राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांना त्याचा योग्य लाभ घेता यावा, यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे व नागरिकांमध्ये जागरूकता वाढवून शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल विश्वास वाढविण्याचे त्यांनी सांगितले.
महसूल सप्ताहातील आयोजित करावयाचे कार्यक्रम :
१ ऑगस्ट – महसूल दिन व महसूल सप्ताह शुभारंभ: उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी पुरस्कार वितरण व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरण समारंभ. तसेच ई-हक्क पोर्टलवर (तलाठ्यामार्फत) आणि सेतु सुविधा केंद्रांमार्फत ऑफलाईन प्रकरणे स्वीकारणे आणि तहसिलदारांकडे पाठवणे.
२ ऑगस्ट – सन २०११ पूर्वीपासून निवासी प्रयोजनार्थ शासकीय जागेवर अतिक्रमण असलेल्या कुटुंबांना अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करणे. ग्रामसेवक व तलाठी यांनी सन २०११ पूर्वीच्या अतिक्रमणधारकांची यादी तयार करून/पुनर्विलोकन करून आवश्यक अर्ज सादर करण्याबाबत सूचना देणे.
३ ऑगस्ट – ‘पालकमंत्री शेत पाणंद रस्ते योजना’ अंतर्गत गाव नकाशा जोडून सादर केलेल्या अतिक्रमण अर्जाचे तहसिलदार स्तरावरुन पुनर्विलोकन करणे. पाणंद/शिवरस्त्यांची मोजणी करून अतिक्रमणमुक्त करणे आणि त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे.
४ ऑगस्ट – प्रत्येक मंडळनिहाय ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ राबवून महसूल विभागाचे लोकाभिमुख कार्य जनतेपर्यंत पोहोचवणे. गावातील तंटामुक्त गाव समितीचे सदस्य, जात पंचायत, जात बियाणे व शैक्षणिक प्रशासकीय आवश्यक असलेले दाखले व कागदपत्रे यांच्यासाठी मार्गदर्शन करणे.
५ ऑगस्ट – ‘विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी देऊन डीबीटी करून अनुदानाचे वाटप करणे. ग्रामपंचायतनिहाय डीबीटी झालेले व डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांची यादी अद्ययावत करणे.
६ ऑगस्ट – शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे निष्कासित करून अतिक्रमणमुक्त करणे. शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत शासन धोरणानुसार (नियमानुकूल करणे/सरकारजमा करणे) निर्णय घेणे.
७ ऑगस्ट – M-Sand धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे धोरण पूर्णत्वास नेणे. महसूल सप्ताहाचा सांगता समारंभ आयोजित करणे.
जिल्ह्याधिकारी कार्यालये तसेच सर्व संबंधित महसूल कार्यालयांनी या कार्यक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.