आदिवासी आश्रमशाळेत सिकलसेल तपासणीने प्रवेशोत्सव साजरा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

मुंबई, 04 जुले – एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत २४ शासकीय आश्रम शाळेत १ जुलै रोजी विद्यार्थ्यांचा शालेय प्रवेशोत्सव कार्यक्रम व विद्यार्थी-पालक मेळावा उत्साहात पार पडला. प्रकल्प अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी करून सिकलसेल आजाराबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतासह सर्व विद्यार्थी व पालकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांसह गणवेशाचे वितरणही करण्यात आले.

गडचिरोली प्रकल्पात गडचिरोली ,कारवाफा, पोटेगाव, पेंढरी , गोडलवाही,सोडे ,मुरूमगाव ,सावरगाव, गॅरापत्ती ,कोटगूल, कोरची, मसेली, सोनसरी,घाटी, रामगड, अंगारा , कुरंडीमाल,रांगी ,भाकरोंडी, येंगलखेडा, येरमागड, रेगडी भाडभिडी,मार्कंडादेव या २४ शासकीय आश्रम शाळा असून त्यात सुमारे ७ हजार ५०० आदिवासी विद्यार्थी आहेत. शैक्षणिक सत्र २०२४-२५ करिता १ जुलैपासून प्रकल्पातील आश्रम शाळा सुरू झाल्या.

यावेळी गावातील मुख्य रस्त्यातून प्रभात फेरी काढून शैक्षणिक व सिकलसेल आजाराबाबत जनजागृती करण्यात आली. रांगोळीने शाळेत सजावट करण्यात आली. कार्यक्रमात आदिवासी विकास विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली. दहावी व बारावीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. शैक्षणिक गुणवत्तापूर्ण शिक्षण,भविष्यवेधी शिक्षण, तंबाखूजन्य पदार्थाचे होणारे दुष्परिणाम, ब्राईटर माईंड याबाबत माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी पालक व विद्यार्थी व प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.