लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हाच्या रक्तरंजित रणांगणावर माओवाद्यांविरुद्ध तब्बल दोन दशके पेक्षा अधिक काळ निर्भयतेने लढा देणाऱ्या सी-६० पथकाचे धडाडीचे पार्टी कमांडर, पोलीस उपनिरीक्षक वासुदेव राजम मडावी यांनी शौर्याची ऐतिहासिक शंभरी पूर्ण केली आहे. १९९८ मध्ये पोलीस शिपाई म्हणून दलात दाखल झालेले मडावी यांनी आजवर ५८ चकमकींमध्ये थेट सहभागी होत एकूण १०१ माओवाद्यांना कंठस्नान घालून आपल्या पराक्रमाची अमिट छाप उमटवली आहे. या अभूतपूर्व कामगिरीबद्दल आज गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
पोलीस शिपाईपासून ते उपनिरीक्षक पदापर्यंतच्या त्यांच्या प्रवासात तीन वेगवर्धित पदोन्नती मिळाल्या आहेत, ज्यातून त्यांच्या शौर्याची आणि नेतृत्वक्षमतेची साक्ष पटते. माओवाद्यांच्या भीषण छावण्यांत निर्भयपणे प्रवेश करून त्यांनी ५ जहाल माओवाद्यांना जिवंत पकडून न्यायाच्या कचाट्यात आणले. त्यांच्या नावावर नोंद झालेल्या बोरीया-कसनासूर (४०), मर्दिनटोला (२७), गोविंदगाव (६), कोपर्शी-कोढूर (५), कतरंगट्टा (३) आणि नुकत्याच झालेल्या कोपर्शी चकमकीतील (४) कामगिरी या गडचिरोलीच्या माओवादी संघर्षाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरल्या गेल्या आहेत.
त्यांच्या शौर्याबद्दल त्यांना राष्ट्रपतींकडून पोलीस शौर्य पदक, असाधारण आसूचना कुशलता पदक, तसेच पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह बहाल झाले असून, आणखी दोन शौर्यपदकांसाठी त्यांचे नाव प्रस्तावित आहे. रणांगणात सहकाऱ्यांसाठी आधारवड ठरलेले मडावी आजही ४८ व्या वर्षी सी-६० पथकाचे नेतृत्व तितक्याच धैर्याने करीत आहेत.
गौरव सोहळ्यात बोलताना पोलीस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले, “मडावी यांची कामगिरी ही केवळ पोलीस दलासाठी नाही तर संपूर्ण गडचिरोलीसाठी प्रेरणा आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे दलाला आत्मविश्वास मिळतो आणि माओवादविरोधी अभियानाला नवी ऊर्जा प्राप्त होते.”
मडावी यांचा प्रवास हा केवळ एका अधिकाऱ्याचा नव्हे तर गडचिरोलीच्या शांततेसाठी लढणाऱ्या हजारो जवानांच्या बलिदान आणि धैर्याचे प्रतीक आहे. शौर्याच्या या शतकातून त्यांनी केवळ पराक्रमच नाही तर गडचिरोलीच्या जनतेसाठी नव्या विश्वासाचे शिखर गाठले आहे.