लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गोवंशांची अवैधरित्या वाहतूक करून ती तेलंगानातील कत्तलखान्याकडे नेणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १७ जनावरांची सुटका केली असून ₹६.७० लाखांचा मुद्देमाल, त्यात एक पिकअप वाहनही समाविष्ट आहे, जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई १० नोव्हेंबर २०२५ रोजी मौजा बेंबाळ (ता. मुल) येथे करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले असता, जनावरांनी भरलेली पिकअप गाडी (क्र. MH-34 CQ-0694) आढळून आली. तपासणीदरम्यान गाडीत पाच जनावरे दाटीने, निर्दयतेने कोंबलेली तर वाहनाखाली आणखी १२ जनावरे सापडली.
या प्रकरणी समर्थ नागेश पुप्पलवार (२१, रा. बेंबाळ) याला अटक करण्यात आली असून चौकशीत त्याचे साथीदार स्वप्नील फुलझेले (रा. एरगाव), मुन्ना शामराव मुद्रिक (रा. बेंबाळ), अशपाक कुरेश व रहमान कुरेश (दोघे रा. गोंडपिपरी) हे सुद्धा या तस्करीत सहभागी असल्याचे उघड झाले आहे. आरोपींनी ही जनावरे तेलंगानाला कत्तलीसाठी नेत असल्याची कबुली दिली.
या प्रकरणी मुल पोलिस ठाण्यात अप.क्र. ४८८/२०२५ नुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पथकात पो.उपनि. विनोद भुरले, सफौ धनराज करकाडे, पो.ह.वा. सुरेंद्र महतो, पो.अ. प्रदीप मडावी, अजीत शेन्डे, प्रफुल्ल गारघाटे आणि नितेश महात्मे यांचा समावेश होता.