श्रमजीवी महिला ठिणगीचा परिवर्तनाचा अध्याय

  • सध्वांसोबत विधवां महिलांनाही हळदी कुंकवाचा मान.
  • जुन्या प्रथेला फाटा देत, नव्या विचारांची पायाभरणी.
  • वाण म्हणून महिलांना सॅनिटरी पॅडची भेट.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

उसगाव दि.26 फेब्रुवारी : श्रमजीवी संघटना ही आदिवासी गरीब दुर्बल घटकांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी संघटना आहे, मात्र संघर्षासोबतच नव्या विचारांचा पुरस्कार संघटनेने नेहमीच केल्याचा इतिहास आहे. माणसाला जनावरांप्रमाणे गुलाम बनविणारी अनिष्ट प्रथाच श्रमजीवी संघटनेने समूळ नष्ट केली. या नवीन वर्षातही श्रमजीवी संघटनेच्या महिला ठिणगी च्या माध्यमातून संघटनेच्या कार्याध्यक्ष स्नेहा दुबे-पंडित यांच्या पुढाकार आणि संकल्पनेतून एक नव्या विचारांचा परिवर्तनाचा अध्याय सूरु केला आहे. हळदी कुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून केवळ सध्वाच नव्हे तर विधवा महिलांना देखील मान सन्मानाने सहभागी करून घेतले जात आहे. विधवा झाल्यानंतर महिलांना अशुभ मानून शुभ मानल्या जाणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमात त्यांचा सहभाग वर्ज्य मानणाऱ्या या प्रतिगामी विचारांच्या प्रथेला फाटा देत नव्या विचारांचा पाया रचण्याचे काम श्रमजीवी संघटनेने हाती घेतले आहे. ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यात हे हळदी कुंकू कार्यक्रम सुरू असून मोठ्या प्रमाणात या विचारांना पाठिंबा मिळत आहे.

महिलेला विधत्व आले की तिला विद्रुप करणे, सती धाडणे इत्यादी अनिष्ट प्रथा त्या त्या काळात झालेल्या बंड आणि क्रांती मुळे नष्ट झाल्या, मात्र आजही पतीचे निधन होताच महिलेचा शृंगार उतरवणे, तिचे कुंकू पुसणे, रंगीबेरंगी साड्या वापरण्याच्या हक्कापासून तिला रोखणे आशा पद्धती समाजात सहजपणे जिवंत ठेवल्या आहेत. दुर्दैवाने अनेकांना यात काहीही गैर वाटत नाही, कोणत्याही शुभ कार्यापासून विधवेला दूर ठेवणे हे ही सहजच होताना दिसत आहे. पुरुष विधुर झाल्यावर मात्र अशी कोणतीही बंधनं पुरुषांवर नाहीत, श्रमजीवी संघटनेच्या संस्थापिका विद्युल्लता पंडित , संस्थापक विवेक पंडित यांनी सुरुवातीच्या काळापासून महिला पुरुष समानता यावर भर देत अनेक महिलांना पुढे आणले, महिलांचे सक्षम नेतृत्व त्यांनी घडवले, नव्या विचारांना चालना दिली. यातूनच भिवंडी तालुक्यातील खातीवली गावच्या श्रमजीवी कार्यकर्त्या लक्ष्मीबाई मुकणे या कातकरी समाजातील एका निरक्षर महिलेने स्पतीच्या निधनानंतर स्वतःचा शृंगार उतरवण्यास समाजाला विरोध केला. सुरुवातीला लक्ष्मीबाईची अवहेलना झाली,मग प्रशंसा आणि आता हळू हळू स्वीकार होत आहे.

श्रमजीवी संघटनेच्या कार्यध्यक्षा स्नेहा दुबे-पंडित यांनी आपल्या आई वडिलांचा वैचारिक वारसा जपत हा विचार प्रकर्षाने पुढे नेण्याचे काम सुरू केले आहे. संघटना आहे त्या प्रत्येक तालुक्यातील महिलांना एकत्र करून महिला ठिणगी हळद कुंकू कार्यक्रम साजरा केला जात आहे. “प्रत्येक तालुक्यात 25 ते 30 टक्के विधवा महिला या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. या विधवा महिलांना सध्वा सुवासिनींप्रमाणेच सन्मानाने हळदी कुंकवाचा मान देताना त्यांच्या डोळ्यांतील समाधान आणि सुरक्षित असल्याची भावना समाधान देत आहे अशी प्रतिक्रिया कार्याध्यक्षा स्नेहा दुबे पंडित यांनी दिली आहे.” यावेळी आरोग्य आणि स्वच्छतेबाबत संदेश देत महिलांना वाण म्हणून महिलांना सॅनिटरी नॅपकिन (पॅड) भेट म्हणून दिले जात आहेत.

या महिना अखेर पर्यंत हे कार्यक्रम ठाणे,पालघर, रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील तालुका तालुक्यात साजरे होत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करत हे कार्यक्रम सूरु असून त्या त्या तालुक्यातील विविध मान्यवर पाहुणे म्हणून या कार्यक्रमात सहभाग नोंदवत आहे

Vivek Pandit