कर्तव्यावर प्राणार्पण केलेल्या शहीद जवानांना मुख्यमंत्री फडणवीस यांचं शतशः अभिवादन

गडचिरोली पोलीस मुख्यालयातील स्मृतीस्थळी मुख्यमंत्री, मंत्रिगण व वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती; पोलीस दलाच्या शौर्याला सलाम...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. ७ :“कर्तव्य म्हणजे केवळ नोकरी नाही, ती एक तपश्चर्या आहे… आणि त्या तपश्चर्येचा सर्वोच्च टोक म्हणजे बलिदान!”—अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोलीतील शहीद पोलीस जवानांच्या त्यागाला आदरांजली वाहिली. सकाळी गडचिरोली पोलीस मुख्यालयातील शहीद स्मारकावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करत त्यांना कृतज्ञतेने नमन केलं.

ही अभिवादन सोहळा केवळ औपचारिक श्रद्धांजली नव्हती, तर नक्षलविरोधी लढ्यात आपला जीव ओवाळून टाकणाऱ्या जवानांच्या आठवणींना उजाळा देण्याचा आणि त्यांचं स्मरण कायम राहावं, यासाठी प्रशासनाच्या वतीने दिलेला एक सामाजिक संकेत होता.

मुख्यमंत्र्यांसोबत सहपालकमंत्री अ‍ॅड. आशिष जयस्वाल, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि पोलीस दलाचे जवान उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांनी शहीद स्तंभाला पुष्पचक्र अर्पण केलं आणि मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली.

गडचिरोली जिल्ह्यात मागील दोन दशकांपासून नक्षलविरोधी लढ्यात अनेक पोलीस जवानांनी आपले प्राण गमावले आहेत. या बलिदानांचं स्मरण राखणं ही केवळ परंपरेची गोष्ट नाही, तर नव्या पिढीला पोलीस दलाचं खरं स्वरूप आणि धैर्य काय असतं, याचं भान देण्याची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितलं की, “गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात विकासाच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करत असतानाच, शहीद जवानांच्या कुटुंबीयांना न्याय देणं आणि त्यांच्या आठवणी जपणं हे शासनाचं प्रथम कर्तव्य आहे.”

राज्य शासनाच्या वतीने शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी पुनर्वसन योजना, शैक्षणिक सवलती, आणि निवृत्तीनंतरच्या योजना प्रभावीपणे राबविल्या जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.

स्मरणीय म्हणजे, याच दौऱ्यात गडचिरोली जिल्ह्यात नक्षल चळवळीतील १२ कडवट माओवादी कार्यकर्त्यांनी आत्मसमर्पण करत मुख्य प्रवाहात येण्याची घोषणा केली होती. अशा पार्श्वभूमीवर, शहीद जवानांचं स्मरण आणि आत्मसमर्पित मावळ्यांचं स्वागत, हे एकाच जिल्ह्यात बदलत्या काळाचं प्रतिक बनून उभं राहत आहे.

गडचिरोलीच्या मातीत रक्त सांडून शांततेचा वसा घेणाऱ्या जवानांचा हा सन्मान, केवळ सरकारपुरता मर्यादित न राहता, जनतेच्याही मनात कायमचा ठसावा, हीच या स्मरण सोहळ्याची खरी दिशा होती.

Cm devdendra Fadnavisgadchiroli policePolice samarak