लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली दि,१८ : विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन अंगीकारून जिद्द, चिकाटी आणि बुद्धिमत्ता जोपासावी, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले. चंद्रपूर–गडचिरोली जिल्हा इन्स्पायर्ड अवॉर्ड प्रदर्शनीचे उद्घाटन अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यालयाच्या प्रांगणात झाले, त्यावेळी ते बोलत होते.
या प्रदर्शनात दोन्ही जिल्ह्यांतील एकूण १९० वैज्ञानिक प्रतिकृती सादर करण्यात आल्या.
उद्घाटनावेळी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वासुदेव भुसे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब पवार, माहिती तंत्रज्ञान विभागाचे जितेंद्र दमाडिया, गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा, तसेच अमरसिंह गेडाम, मुकुंद म्हशाखेत्री, ओमप्रकाश संग्रामे, धारेंद्र आंबीलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
गाडे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारण्याची सवय विकसित करणे आवश्यक आहे. दैनंदिन जीवनातील समस्यांवर उपाय शोधण्याची वृत्तीच विज्ञानाला चालना देते. कृषी, आरोग्य, प्रशासन आणि शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वाढता वापर अधोरेखित करत त्यांनी विद्यार्थ्यांनी Artificial Intelligence, Robotics आणि इतर आधुनिक क्षेत्रांमध्ये संधी साधाव्यात, असे आवाहन केले.
गडचिरोली जिल्ह्यात मुबलक पावसाचे स्रोत आणि बारमाही नद्या असूनही जिल्हा मागासलेला म्हणून ओळखला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्ह्यातील बालमृत्यू कमी करण्यासाठी आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढवण्यासाठी विविध उपाययोजना सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (नवी दिल्ली) व राज्य विज्ञान संस्था (नागपूर) यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांमध्ये नवकल्पना विकसित करण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचे स्पष्ट केले. परिसराला वैदर्भीय संशोधक डॉ. कमल रणदिवे यांचे नाव देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. गडचिरोलीत कर्करोगाचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्यांच्या संशोधनाचा संदर्भ महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रदर्शनासाठी विविध समित्यांनी सहकार्य केले. संजय खांडरे, नरेंद्र भोयर, विवेक हुलके, किशोर पाचभाई, अजय लोंढे, धर्मेंद्र मुनघाटे, अविनाश गौरकार, दामोधर शिंगाडे, प्रियंका डांगेवार, साईनाथ अद्दलवार, हरिश बावनकर, रवी म्हशाखेत्री, सचिन फुलझेले, रुपेश बारसागडे, रुपराम निमजे, तसेच स्काऊट जिल्हा संघटक विवेक कहाळे आणि गाईडच्या निता आगलावे यांनी विशेष परिश्रम घेतले.