लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ओमप्रकाश चुनारकर,
‘संपादकीय लेख”
पेदाकोरमच्या मातीत एका निष्पाप पावलांचं रक्त सांडलं. एक अनिल गेला. तेरा वर्षांचा, सातवीत शिकणारा, डोळ्यांत भविष्याची स्वप्नं घेऊन चालणारा. पण त्याचं भविष्य नक्षलवादाच्या बंदुकीने गोळ्यांच्या स्वरूपात उद्ध्वस्त केलं. या मुलाचं कुठं राजकारण होतं? कुठं संघर्ष? कुठं पक्ष? तो लढत नव्हता, तो शिकत होता. तरीही तो मारला गेला. कारण नक्षलवादाला आता कारण लागत नाही. संशय पुरेसा असतो, आवाज पुरेसा असतो, आणि जास्त वेळा – गप्प राहणंही पुरेसं ठरतं.
शहरातल्या एसी केबिनमध्ये बसून ज्यांना आजही वाटतं की नक्षलवाद ही आदिवासींची क्रांती आहे, त्यांनी एकदा पेदाकोरमच्या मातीला हात लावून पाहावं – ती अजूनही गरम आहे, अनिलच्या रक्ताने. क्रांती जर शाळेत जात असलेल्या मुलाच्या छातीत गोळ्या घालते, तर ती क्रांती नाही, ती कुचंबलेली, माणुसकीपासून दुरावलेली अंध हिंसा आहे. ही हिंसा आता केवळ सरकारी यंत्रणेला नाही, तर स्वतःच्या माणसालाही ओळखत नाही.
शिवमंदिर ते जयस्तंभ चौक पर्यंत निघालेला कँडल मार्च या हत्येच्या विरोधात एक भावना नव्हती – ती होती अस्वस्थतेची जागृती. मेणबत्त्यांचे थरथरणारे उजेड ही श्रद्धांजली नव्हती, ती समाजाच्या मनात पेटलेली एक विचारज्वाला होती. त्या दोन मिनिटांच्या मौनात, संपूर्ण गडचिरोली, छत्तीसगड,बस्तर, आणि देशातील प्रत्येक सजग माणसाच्या अंतर्मनात एक गर्जना झाली – “बस्स झालं!” पण प्रश्न आहे – ही गर्जना नुसती सोशल मीडियावर थांबेल का, की खऱ्या अर्थाने गावोगावी पोचेल?
महेंद्र कर्मा यांच्या हत्येनंतरही आपण काहीच शिकलो नाही. ‘बस्तर टायगर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नेत्याला संपवून आदिवासी आवाज दाबण्यात आला. आणि आज त्या आदिवासींच्याच घरांतील मुलं शांतपणे मारली जात आहेत. ही केवळ घटना नाही, ही एक सातत्याने चाललेली योजना आहे – आदिवासी समाजाला पिळून त्याच्या चितेवर तथाकथित क्रांती उभी करण्याची.
नक्षलवाद्यांच्या बंदुकीतून बाहेर पडणारी गोळी आता राज्यविरोधी विचारांवर नाही, ती शाळकरी मुलांवर चालते. शासकीय योजना पोहोचू नयेत म्हणून शाळा फोडल्या जातात, आरोग्य केंद्र जाळले जातात, अंगणवाडी सेविकांना धमकावलं जातं. आणि तरीही काही प्रबुद्ध मंडळी अजूनही ‘नक्षल चळवळ ही विचारधारा आहे’ असं म्हणतात. विचारधारा जर रक्ताच्या साक्षीने मोजली जात असेल, तर तिचं मोल संपलेलं आहे.
या चळवळीचा केंद्रबिंदू कधीच आदिवासी नव्हते – आदिवासी केवळ एक साधन होते. आंध्र, तेलंगणा, बंगालमधून आलेल्या हत्यारबाजांनी या भागात विष कालवलं, आणि त्या विषातून जन्म झाला असंख्य अनिल माडवींनी – जे कधी पोलिसांच्या गोळ्यांनी मरतात, कधी नक्षलवाद्यांच्या, पण दरवेळी त्यांचं मरण एक आकडा बनून राहतं. यंत्रणांचं मौन आणि पक्षीय स्वार्थ यांच्या कात्रीत आज बालपणाची गळचेपी होते आहे.
आज वेळ आली आहे की आदिवासी समाजानं स्पष्ट निवड करावी – आपण आयुष्याला साथ द्यायची की मृत्यूला? आता पुरेसं झालं! बरेच पिढ्या बंदुकीच्या धाग्यावर लटकवलेल्या पाहिल्या. आता सरकार केवळ पोलिस घेऊन नाही, तर विकास घेऊन येते आहे. सीआरपीएफ ही केवळ शस्त्रबळ नाही, ती शांतीचा रक्षक आहे. जंगलात आता फक्त ‘लढा चालू आहे’ असं नाही म्हणायचं – ‘शाळा चालू आहे’, ‘औषधं मिळत आहेत’, ‘संधी मिळत आहेत’ असं म्हणायचं.
अनिलच्या हत्येचा निषेध म्हणजे केवळ त्याच्या मृतदेहासमोर मेणबत्ती लावणं नव्हे, तर आपल्या समाजाच्या उजेडासाठी पेटणं आहे. आता समाज म्हणून आपली परीक्षा आहे – आपण अनिलसाठी काही करू शकतो का? की उद्या अनिल तुमच्याच घरात असणार आहे आणि पुन्हा आपण त्याच मौनात सामील होणार?
हा लेख कुणावर टीका करण्यासाठी नाही, ही एक किंकाळी आहे – की किती मुलं अजून मरतील? किती श्वास असं संपतील? आणि आपण किती वेळा ‘खेद व्यक्त’ करत राहणार?
अनिल मेला नाही. तो मारला गेला. आपल्या सगळ्यांच्या निष्क्रियतेने. आता तरी उठूया. कारण जर समाज गप्प बसला, तर पुढची गोळी कुठे लागेल, हे कुणालाही ठाऊक नाही.