विद्युत लपंडावाने नागरिक हैराण – महावितरणच्या विरोधात संतप्त नागरिकांचे निवेदन

अहेरी-आलापल्लीतील वारंवार वीजपुरवठा खंडित; व्यापाऱ्यांचे नुकसान, सामान्यांचे जनजीवन विस्कळीत.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

अहेरी, ७ ऑगस्ट :

अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील वीज वितरण केंद्राकडून नियमित व स्थिर वीजपुरवठा अपेक्षित असतानाही गेल्या दोन आठवड्यांपासून परिसरातील नागरिक सतत वीज लपंडावाचा त्रास सहन करत आहेत. उच्च दाबाचा झटका, कधी अत्यल्प व्होल्टेज, आणि अनियमित वीजपुरवठा यामुळे घरगुती उपकरणांचे नुकसान तर होत आहेच, पण स्थानिक व्यापाऱ्यांना देखील आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

“भरमसाठ बिल आकारूनही Mahavitaran चा दर्जा ढासळलेला आहे,” अशी नाराजी नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. अशा स्थितीत नागरी संताप उसळू लागला असून या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना लेखी निवेदन सादर केले.

विशेष म्हणजे, प्रभाग क्रमांक २, ३, ४ व ५ तसेच धर्मपूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे. यामुळे घरगुती व लघुउद्योग क्षेत्रावर थेट परिणाम झाला आहे. धर्मपूर वॉर्डातील ट्रान्सफॉर्मर काही दिवसांपूर्वीच जळून गेला असून, याची माहिती देऊनही महावितरणकडून अद्याप ना दुरुस्ती झाली, ना नवीन यंत्रणा बसवण्यात आली आहे.

वारंवार फोनद्वारे तक्रार करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर नागरिकांनी थेट लेखी मार्गाने आपली नाराजी नोंदवली. या निवेदनात नगरसेवक विलास सीडाम, छत्रपती गोवर्धन, तसेच अनेक महिलावर्ग आणि ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते.

“दररोजच्या या अनिश्चित वीजपुरवठ्यामुळे जीवनशैली पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. आता आमची सहनशीलतेची परीक्षाच घेतली जात आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.

आलापल्ली हे महावितरणचे उपकेंद्र असतानाही येथेच सर्वाधिक समस्या जाणवत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांनी दिलेल्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

Allapali electricity issue