लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी : शहरातील इंदिरानगर परिसर, ज्याला स्थानिक पातळीवर “बेघर कॉलनी” म्हणून ओळखले जाते, तेथील रहिवाशांना अखेर न्याय मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. तब्बल चाळीस वर्षांपासून महसूल विभागाच्या जमिनीवर वास्तव्यास असलेल्या शेकडो कुटुंबांना जागेचे मालकी हक्क नसल्यामुळे कोणत्याही शासकीय योजना किंवा घरकुल लाभांपासून ते वंचित राहिले होते. या अन्यायाविरुद्ध भाजप नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांनी नगरपंचायतीकडे ठोस भूमिका घेत निवेदन सादर केले.
गुडेल्लीवार यांनी मुख्याधिकारी गणेश शहाणे यांच्याकडे दिलेल्या निवेदनात, इंदिरानगर वसाहतीतील नागरिकांना त्यांच्या मालकीचे हक्क देऊन प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत घरकुल मंजूर करावेत, तसेच बेघर कॉलनी ही असंवेदनशील ओळख रद्द करून या वसाहतीस सन्मानजनक नवे नाव द्यावे, अशी मागणी केली.
या निवेदनावर सकारात्मक प्रतिसाद देत मुख्याधिकारी गणेश शहाणे यांनी येत्या तीन महिन्यांत सर्व पात्र नागरिकांना मालकी हक्क देण्याची आणि घरकुल योजना लागू करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे आश्वासन दिले.
या निर्णयामुळे चार दशकांपासून अस्थिर आयुष्य जगणाऱ्या रहिवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवेदनावेळी नगरसेवक गुडेल्लीवार यांच्यासोबत इंदिरानगर वसाहतीतील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.