जिल्हाधिकारी यांची कोरोना विषयक आढावा बैठक: शासकीय रुग्णालयात आवश्यकतेनुसार कंत्राटी डॉक्टरांच्या सेवा घेण्याचे निर्देश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर दि. १७ एप्रिल: जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यांना शासकीय रुग्णालयात तत्परतेने आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी जेथे डॉक्टरांची संख्या कमी पडत असतील तेथे कंत्राटी तत्वावर डॉक्टर व इतर आरोग्य सेवकांच्या सेवा वाढविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आरोग्य विभागाला दिल्या.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज जाणून घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात ही बैठक पार पडली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड, उपजिल्हाधिकारी ( पुनर्वसन) जनार्दन लोंढे, , वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर सोनारकर, डॉ. श्रीकांत परांजपे, डॉ.श्रीकांत मसराम, डॉ. दीप्ती श्रीरामे यासह आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कोविड रुग्णालयांमधील डॉक्टरांच्या सेवा, ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटर बेडची उपलब्धता याची माहिती जाणून घेतली. रुग्णालयात रुग्णांना आवश्यक सेवा पुरवाव्यात, वार्डात स्वच्छता राखावी, वार्ड निहाय सेवा देणाऱ्या डॉक्टरांची नावे व संपर्क क्रमांक यांचे योग्य ते फलक लावावेत, जेणेकरून रुग्णांच्या नातेवाईकांना अडचण जाणार नाही व योग्य ती माहिती मिळेल, अशा सूचना यावेळी दिल्या. त्यासोबतच रुग्णालयात बायोमेट्रिक पद्धतीने उपस्थिती नोंदविण्याचे ही निर्देश दिले.

Ajay Gulhane