समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहूनच काम करावे – सिईओ आयुषी सिंह

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, 25 जून – जिल्ह्यातील दुर्गम भागात आरोग्य यंत्रणा बळकटीकरणाकडे अजून एक पाऊल टाकतांना जिल्हा परिषद आरोग्य विभागाद्वारे जिल्ह्यातील ५८ आरोग्य वर्धिनी केंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी नेमण्यात आले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी या नवनियुक्त समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे समुपदेशन करून त्यांना नियुक्तीच्या ठिकाणीच मुख्यालयात उपस्थित राहून आरोग्य सेवा देण्याचे निर्देश दिले.

जिल्हा प्रशासनाद्वारे नुकतेच जिल्ह्यातील १९ प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली होती, तद्नंतर लगेचच आता समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनाही नियुक्ती देण्यात आली आहे.

कालच झालेल्या आयुष्यमान भारत कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यात समुदाय आरोग्य अधिकारी यांची रिक्त 122 पदापैकी 58 पदे समुपदेशनाने भरण्यात आली, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे यांनी यांनी दिली. जिल्हा आरोग्यवर्धीनी सल्लागार डॉ. दिक्षांत मेश्राम व जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. राहुल ठिगळे यांनी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना प्रशासकीय बाबींचे मार्गदर्शन केले.

Comments (0)
Add Comment