लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, २० मे : गडचिरोली जिल्ह्यात प्रधानमंत्री जनजातीय महासन्मान (पीएम-जनमन) आणि धरती आबा या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांची अंमलबजावणी गतीने व्हावी यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज प्रशासनातील विविध यंत्रणांना ठोस आणि कडक सूचना दिल्या. येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर घरकुलांची कामे पूर्ण करणे, आदिवासी पाड्यांपर्यंत रस्ते जोडणे आणि आरोग्य सेवा पोहोचवणे या बाबतीत अधिकाऱ्यांनी यंत्रणा सज्ज ठेवाव्यात, असे ते म्हणाले.
जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या या आढावा बैठकीला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिकारी रणजित यादव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार हे प्रत्यक्ष उपस्थित होते, तर दूरदृश्यप्रणालीद्वारे उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांनी सहभाग नोंदवला.
बैठकीदरम्यान पीएम-जनमन योजनेअंतर्गत आतापर्यंत झालेल्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात एकूण ७००१ घरकुलांसाठी अर्ज आले असून, त्यापैकी ६८७४ प्रकरणांना मंजुरी मिळाली आहे. यापैकी ६३८६ लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचा निधी, २०२२ लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याचा, आणि १०२४ लाभार्थ्यांना तिसऱ्या हप्त्याचा निधी वितरित झाला आहे. सध्या १०२४ घरकुलांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामेही पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
रस्त्यांची कामे रखडली, वनविभागाच्या परवानग्यांवर अडथळा
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत आदिवासी पाड्यांना मुख्य रस्त्यांशी जोडणाऱ्या दहा रस्त्यांचे काम मंजूर झाले आहे. मात्र यातील बहुतेक कामे वनविभागाच्या परवानग्या अभावी रखडली आहेत. ही बाब गंभीर मानत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दोन दिवसांत परवानगी प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे आदेश दिले. वनविभाग व कार्यान्वयन यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव दूर करण्यासाठी त्यांनी मुख्य वनसंरक्षकांच्या निदर्शनासही ही बाब आणून दिली.
मोबाईल युनिट्सची प्रत्यक्ष तपासणी करा…
जिल्ह्यात १३ मोबाईल मेडिकल युनिट्समार्फत गरोदर मातांची तपासणी, लसीकरण, सिकलसेल आणि क्षयरोग तपासणीसारख्या सेवा सुरू आहेत. मात्र या सेवा प्रभावीपणे पोहोचत आहेत का, याबाबत प्रशासनातच शंका निर्माण झाली असून, जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शिबिरांना भेट देऊन पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
धरती आबा योजनाही वेगाने राबवण्याचे आदेश…
धरती आबा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ४११ गावांमध्ये आरोग्य तपासणी, वैयक्तिक लाभ योजना, सौर ऊर्जेचे कनेक्शन, वनधन केंद्रे उभारणी व कृषीविषयक उपक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमांची अंमलबजावणी अधिक प्रभावी व्हावी यासाठी प्रकल्प अधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देण्यास सांगण्यात आले. अधिकाधिक कॅम्प घेऊन योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
‘समन्वयानेच यश’: जिल्हाधिकाऱ्यांचा संदेश..
“शासनाच्या महत्त्वाच्या योजनांचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रत्येक यंत्रणेने समन्वयाने आणि जबाबदारीने काम करणे गरजेचे आहे. सर्व अधिकारी हे या प्रक्रियेतील प्रमुख चालक असून त्यांची कार्यक्षमता जिल्ह्याच्या प्रगतीचा मार्ग निश्चित करते,” असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.