लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १४ जुलै : कुरखेडा तालुक्यातील सती नदीवरील राष्ट्रीय महामार्गावरील अपूर्ण पुलाची पाहणी करत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी संबंधित यंत्रणेला ४५ दिवसांची स्पष्ट डेडलाइन देत, यापुढे कोणताही विलंब खपवून घेतला जाणार नाही असा इशारा दिला. पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शासकीय यंत्रणेचा आढावा घेत पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत ४०७ शेतकऱ्यांचे सुमारे १५० हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून, याचे पंचनामे अंतिम टप्प्यात असल्याची माहिती तहसीलदार राजकुमार धनबाते यांनी दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी, महसूल, बांधकाम व आरोग्य विभागाला सजग राहून मदतीचा एकही दिवस न दवडण्याचे आदेश दिले.
कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस युनिट अद्याप सुरू न झाल्याचे लक्षात घेत त्यांनी कार्यकारी संस्था हिंद लॅब विरोधात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच रुग्णालयातील अपूर्ण विद्युतीकरण तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले. मलेरियासारख्या आजारांच्या संभाव्य प्रादुर्भावावर उपाययोजना म्हणून गावपातळीवर घरभेटी, तापाचे रुग्ण शोधणे, रक्तनमुने संकलन, डबक्यांत गप्पी मासे सोडणे आणि औषध फवारणीसह जनजागृती मोहिमा राबविण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले.
तहसील कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीस उपविभागीय अधिकारी प्रशांत गड्डम, गटविकास अधिकारी, आरोग्य, कृषी, पोलीस, महसूल व वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. एकूणच जिल्हाधिकाऱ्यांच्या दौऱ्याने स्थानिक प्रशासनाला चाप बसला असून, पूरग्रस्तांसाठी तो दिलासा देणारा ठरला आहे.