महागाव व किष्ठापूर ग्रामपंचायतीवर काँग्रेस-आविसंचा झेंडा राष्ट्रवादी (अजित गट) व भाजपला जबर धक्का

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी, ता. १४ : अहेरी तालुक्यातील महागाव आणि किष्ठापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस व आदिवासी विद्यार्थी संघटनेने (आविसं) जोरदार मुसंडी मारत सत्ताधाऱ्यांना धक्का दिला आहे. या दोन्ही ग्रामपंचायती काँग्रेस-आविसच्या ताब्यात गेल्यामुळे तालुक्यात राजकीय हालचालींना गती आली आहे.

महागाव ग्रामपंचायतीवर यापूर्वी भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची युती सत्ता होती, तर किष्ठापूर ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा एकहाती कब्जा होता. मात्र, या पार्श्वभूमीवर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि आविसंने दोन्ही ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित केले.

सरपंचपदावर बिनविरोध विजय..

महागाव येथून वंदना दुर्गे तर किष्ठापूर येथून नरेंद्र मडावी यांची बिनविरोध सरपंचपदी निवड झाली. या दोघांचाही पक्षीय पाठिंबा काँग्रेस व आदिवासी विद्यार्थी संघाकडून असल्यामुळे हा विजय सत्ताधाऱ्यांसाठी धक्कादायक ठरला आहे.

या निवडणुकीचे नियोजन काँग्रेस-आविसचे अहेरी विधानसभा समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हाध्यक्ष हणमंतु मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

राजकीय उलथापालथीची नांदी..

किष्ठापूर ग्रामपंचायतीतील माजी सरपंचाविरोधात अविश्वास ठराव आणून सत्तांतर घडवण्यात आले. ही केवळ सरपंच पदाची निवड नसून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय भूकंपाची चाहूल असल्याचे स्थानिक राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

कार्यकर्त्यांचा उत्साह..

या निवडीच्या वेळी माजी उपसरपंच अशोक येलमुले, माजी जि.प. सदस्य अजय नैताम, माजी सभापती सुनीता कूसनाके, भास्कर तलांडे, सुरेखा आलम, गीता चालूरकर, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, रसिका सडमेक, मयुरी तलांडे, योगिता करपेत, अनुराधा सर्धार यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस-आविस कार्यकर्ते उपस्थित होते.

नवनिर्वाचित सरपंचांचा फूलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. गावकऱ्यांमध्ये नव्या नेतृत्वाकडून विकासाची आशा निर्माण झाली आहे.