लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, १३ ऑगस्ट —
लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. राहुल गांधी यांनी मतदार याद्यांमधील मोठ्या प्रमाणातील गैरव्यवहार उघड करत भारतीय जनता पक्षावर व निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेस पक्षाचा आरोप आहे की, निवडणूक आयोगाच्या सहकार्याने मतदार यादीत फेरफार करून आणि मतचोरीद्वारे सत्ता मिळविण्यात आली आहे. हा प्रकार केवळ राजकीय वादापुरता मर्यादित नसून प्रत्येक मतदाराच्या विश्वासाचा आणि मतदानाच्या पवित्र अधिकाराचा अवमान आहे.
या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीने मत चोरीविरोधात जिल्हाभर स्वाक्षरी अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.०० वाजता जिल्हा काँग्रेस कार्यालयापासून इंदिरा गांधी चौकापर्यंत कॅण्डल मार्च काढून या प्रकरणाचा तीव्र निषेध व्यक्त केला जाणार आहे.
जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी आवाहन केले की, “मतचोरी हा लोकशाहीवर घात आहे. हा अन्याय थांबवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आवाज उठवला पाहिजे. या स्वाक्षरी अभियान व कॅण्डल मार्चमध्ये काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला, शेतकरी, व्यापारी आणि लोकशाहीवर विश्वास ठेवणारे सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.”
या आंदोलनाचा उद्देश मतदारांना जागरूक करणे, मताधिकाराच्या पवित्रतेचे रक्षण करणे आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी जनजागरण निर्माण करणे हा आहे.