लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २० : राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल सखोल ज्ञान, लोकशाही मूल्यांची जाणीव आणि सामाजिक न्यायाची बांधिलकी निर्माण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग यांच्या पुढाकारातून ‘संविधान जागृती प्रश्नमंजूषा २०२५-२६’ हा राज्यव्यापी उपक्रम उत्साहात राबविण्यात येत आहे. आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य अॅड. धर्मपाल मेश्राम यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
या उपक्रमांतर्गत ऑनलाईन संविधान प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले असून तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत प्रशिक्षण दिले जात आहे. महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर येथील डॉ. कैलास वसावे, डॉ. दिविता कोठेकर, डॉ. आरती तायडे, डॉ. व्ही. पी. तिवारी तसेच महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, मुंबई येथील डॉ. जगदीश खोब्रागडे, डॉ. साहिली सुरजुसे आणि डॉ. अमोल चौव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण प्रभावीपणे पार पडत आहे.
या राज्यव्यापी उपक्रमातील विशेष सत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून एम. एस. जावळकर, अतिरिक्त न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालय (नागपूर खंडपीठ) यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे सखोल आणि प्रेरणादायी मार्गदर्शन केले. भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार, कर्तव्ये, समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी विद्यार्थ्यांना सजग, जबाबदार आणि संवेदनशील नागरिक बनण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी अभ्यासपूर्ण आणि समर्पक उत्तरे देत संवाद अधिक समृद्ध केला.
सत्रात आर. सी. चौव्हाण, पृथ्वीराज चौव्हाण, माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित तसेच माजी आयुक्त (समाज कल्याण) इ. झेड. खोब्रागडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत संविधान मूल्यांची जपणूक करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनाल अ. थुल यांनी केले. डॉ. जगदीश खोब्रागडे, डॉ. साहिली सुरजुसे आणि डॉ. आरती तायडे यांची उपस्थिती लाभली. विशेष म्हणजे, राज्यातील विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवून या उपक्रमास अधिक व्यापक आणि प्रभावी रूप दिले.
‘संविधान जागृती प्रश्नमंजूषा २०२५-२६’ हा उपक्रम केवळ स्पर्धा नसून संविधान मूल्यांची जपणूक, जागरूक नागरिकत्वाची जाणीव आणि लोकशाही बळकटीसाठीची प्रेरणादायी चळवळ ठरत आहे. राज्यातील युवक-युवतींमध्ये संविधानाबद्दल अभिमान, कर्तव्यभावना आणि सामाजिक उत्तरदायित्व निर्माण करण्याच्या दिशेने हा उपक्रम निश्चितच एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरत आहे.