‘गोंडवाना’ चा दीक्षांत समारंभ चंद्रपुरात होणे पर्वणी!

वन प्रबोधनीचे सभागृह होईल सज्ज

व्यवस्थापन परिषदेने घेतला निर्णय: कुलसचिव चिताडे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, 9 जानेवारी: गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ यंदा पहिल्यांदाच चंद्रपुरात होत आहे. आजवर तो मुख्यालय असलेल्या गडचिरोली येथे व्हायचा. मात्र, कोवीड आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या सार्‍या शक्यता लक्षात घेता हा समारंभ येत्या 28 जानेवारीला चंद्रपूर येथील वन प्रबोधनीच्या भव्य सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत घेण्यात आला, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल चिताडे यांनी दिली आहे.

तत्पूर्वी, चंद्रपुरातील अनेक स्थळांची पाहणी एका समितीने केली होती. अखेर नव्याने बांधण्यात आलेल्या आणि निसर्गरम्य स्थळ असलेल्या वन प्रबोधनीची निवड करण्यात आली. या समारंभाला राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी हे स्वत: उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कदाचित विविध कारणांनी रखडलेल्या वन अकादमीचेही अनौपचारिक लोकार्पण होण्याची शक्यता ऐकिवात आहे. परंतु, त्यास वन प्रबोधनीचे सह प्रमुख प्रशांत खाडे यांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही. दीक्षांत समारंभ हा विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधकांसाठी मोठी पर्वणी असते. चंद्रपूर जिल्ह्याने हा सोहळा कधी अनुभवला नाही. त्यामुळे येथील शैक्षणिक क्षेत्रात या निर्णयामुळे उत्साह आहे.

या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी असून, प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाचे संचालक डॉ. एस. सी. शर्मा, गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे आदी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम विचाराअंती चंद्रपुरात घेतला जात असल्याने त्यास सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी कुलसचिव डॉ. अनिल चिताडे यांनी केले आहे.

Gondwana University Gadchiroliप्रभारी कुलसचिव डॉ. अनिल चिताडे