“कोरोना गेला खड्ड्यात, आधी आमच्या एफआरपीचे पैसे द्या”- माजी खा. राजू शेट्टी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सांगली, दि. १६ मार्च: कोरोना गेला खड्ड्यात, आधी आमच्या एफआरपीचे पैसे द्या”, असा गर्भित इशारा स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांना दिला आहे. यावेळी बोलताना भ्रष्टाचार आणि दालन सजवायला पैसा आहे, मग वीज बील माफ करायला का नाही? असा संतप्त सवाल करत त्यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला. ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

ऊसाचा एफआरपी, वीज बिल माफी आणि अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या गाडीच्या मुद्द्यावरुन स्वाभिमानीचे खा. राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारसह विरोधी पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. उसाच्या एफआरपीवरून बोलताना शेट्टी म्हणाले, राज्यात कोरोनामुळे आंदोलन करायला मर्यादा पडतात, आणि त्याचा हे फायदा उठवत आहेत.पण आता “कोरोना गेला खड्ड्यात, आधी आमचा एफआरपी द्या,अशी भूमिका आम्हाला घ्यावी लागेल” असा इशारा शेट्टी यांनी दिला.

याशिवाय वीज बिला माफ़ीवरून बोलताना देशातील चार राज्यांमध्ये वीज दरात सवलत दिली गेली आहे, मग महाराष्ट्र का देत नाही? आणि भ्रष्टाचारात मुरवायला, दालन सजवायला पैसे आहेत, मग वीज बिलांसाठी का नाही एवढा साधा प्रश्न आहे.त्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावे लागत असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले. तसेच अंबानी, मनसुख हिरेन आणि वझे प्रकरणावरून बोलताना ते म्हणाले, की “मला फक्त एकच प्रश्न सगळ्याच राजकीय पक्षांना विचारायचा आहे, महाराष्ट्रात फक्त मुकेश अंबानी राहतात का? बाकी 14 कोटी कोण राहतं की नाही? असा सवालही यावेळी राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.