लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जंगलात गुरे चारून गावाकडे परतणाऱ्या गुराख्याला हत्तीच्या कळपाने निशाणा बनवल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी (१० सप्टेंबर) सायंकाळी साडेचार वाजता पोर्ला वनपरिक्षेत्रातील चुरचुरा बिटात घडली. वामन मारोती गेडाम (६२, रा. चुरचुरा, मालगुजारी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
नेहमीप्रमाणे वामन गेडाम सकाळी सुमारास ११ वाजता आपली गुरे चारण्यासाठी चुरचुरा–पिपरटोला जंगलात गेले होते. त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ महादेव गेडाम आणि हिरोबी खोब्रागडे हेही जनावरे घेऊन जंगलात गेले होते. सायंकाळी सर्वजण गुरे गावाकडे नेत असताना अचानक दक्षिणेकडून हत्तींचा कळप समोर आला. महादेव गेडाम आणि हिरोबी खोब्रागडे हे जीव वाचवण्यासाठी पळून गेले, मात्र वामन गेडाम हत्तीच्या तावडीत सापडले.
कळपातील एका हत्तीने त्यांना सोंडेने पकडून रस्त्यालगतच्या पाटात आपटले आणि त्यानंतर पायाने तुडवले. या निर्दयी हल्ल्यात गेडाम यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोर्ला वनपरिक्षेत्र अधिकारी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह सायंकाळी सात वाजता जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.
अंदाज चुकला, प्राण गमवावा लागला…
स्थानिकांच्या माहितीनुसार, यापूर्वी संपूर्ण हत्तींचा कळप रस्ता ओलांडून उत्तर दिशेने देशपूरकडे गेला, असा अंदाज वामन गेडाम व त्यांच्या सोबत्यांनी बांधला होता. मात्र, काही हत्ती अजूनही परिसरात थांबलेले होते. ह्याच हत्तींपैकी एका हत्तीने गेडाम यांच्यावर हल्ला केल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागला.