लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. ८ :
माओवादग्रस्त, दुर्गम व आदिवासीबहुल जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीत कायदा-सुव्यवस्था, सामाजिक सुरक्षा आणि युवकांचे भवितव्य या तिन्ही आघाड्यांवर गडचिरोली पोलिसांनी एकाच वेळी ठोस, परिणामकारक आणि दिशादर्शक कामगिरी करून दाखवली आहे. अवैध अंमली पदार्थांवर कठोर कारवाई, दारूबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि बेरोजगार युवक-युवतींसाठी कौशल्याधारित रोजगारनिर्मिती — या तीनही बाबींमुळे गडचिरोली पोलिसांची भूमिका केवळ कायदा रक्षकांची न राहता समाज परिवर्तनाची ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अंमली पदार्थ तस्करीला जबरदस्त चाप : १५ लाखांचा गांजा जप्त….
जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थ तस्करीविरोधात शून्य सहनशीलतेचे धोरण राबवत, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने कोरची तालुक्यातील मौजा हितकसा येथे धडक कारवाई केली. घराच्या सांदवाडीत गांजाची लागवड करून विक्रीच्या तयारीत असलेल्या पुनाराम अलिसाय मडावी (वय ४५) याला ताब्यात घेण्यात आले. पंचासमक्ष झडतीत १६० गांजाची झाडे, ३०.३७५ किलो वजनाचा गांजा व इलेक्ट्रॉनिक काटा असा तब्बल १५ लाख १९ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीस पोलीस कोठडी देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दुर्गम आदिवासी भागातही अंमली पदार्थांचे जाळे उखडून टाकण्याची पोलिसांची ठाम इच्छाशक्ती या कारवाईतून स्पष्ट होते.
दारूबंदी कायद्याची ठोस अंमलबजावणी : १९.६७ लाखांचा मुद्देमाल नष्ट….
गडचिरोली जिल्ह्यात लागू असलेल्या दारूबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करत, देसाईगंज पोलीस ठाण्याने सन २०२३ ते २०२५ या कालावधीत दाखल ३७२ गुन्ह्यांतील जप्त दारूचा साठा न्यायालयाच्या परवानगीने नष्ट केला. विदेशी व देशी दारू, बिअर असा एकूण १९ लाख ६७ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल जेसीबी व रोड रोलरच्या सहाय्याने पंचासमक्ष नष्ट करण्यात आला. विशेष म्हणजे, ही कारवाई करताना पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही, याची संपूर्ण दक्षता घेण्यात आली. दारूबंदी केवळ कागदावर न ठेवता प्रत्यक्षात उतरवण्याचा पोलिसांचा निर्धार या कारवाईतून दिसून आला.
कायद्यासोबत करुणा : १२० युवक-युवतींना रोजगाराची नवी वाट…
कठोर कारवाईसोबतच समाज उभारणीचा सकारात्मक चेहरा गडचिरोली पोलिसांनी ठळकपणे समोर आणला आहे. पोलीस दादालोरा खिडकी आणि प्रोजेक्ट उडान अंतर्गत स्किलिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून अतिदुर्गम भामरागड, अहेरी, एटापल्ली, हेडरी येथील १२० बेरोजगार युवक-युवतींना चारचाकी वाहन चालक प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींचा निरोप समारंभ गडचिरोली पोलीस मुख्यालयात पार पडला. सर्व प्रशिक्षणार्थींना लर्निंग परवाना देण्यात आला असून कायमस्वरूपी परवाना प्रक्रियेत आहे. सन २०२५-२६ मध्ये एकूण ९९० युवक-युवतींना विविध कौशल्य प्रशिक्षण देण्याचा संकल्पही यावेळी अधोरेखित करण्यात आला.
अंमली पदार्थ व दारूविरोधात कठोर भूमिका घेताना, दुसरीकडे युवकांच्या हाताला काम देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा समतोल दृष्टिकोन गडचिरोली पोलिसांनी दाखवून दिला आहे. दुर्गम आदिवासी भागातही कायद्याची धाक आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणारी ही तिहेरी कामगिरी जिल्ह्यासाठी निश्चितच अभिमानास्पद ठरत असून, अशीच कारवाई सातत्याने सुरू राहिल्यास गडचिरोली पोलीस दलाची प्रतिमा अधिक उंचावेल, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे..