अहेरीत सीआरपीएफ ३७ व्या बटालियनची तिरंगा बाइक रॅली

‘हर घर तिरंगा’ अभियानात देशभक्तीचा जोश...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी, दि. १२ : भारत सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ या राष्ट्रप्रेम जागवणाऱ्या अभियानांतर्गत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ३७ व्या बटालियनने मंगळवारी अहेरी तालुक्यात भव्य तिरंगा बाईक रॅली काढून स्वातंत्र्याचा उत्साह उंचावला. प्राणहिता पोलीस कॅम्प येथून सुरुवात झालेली ही रॅली नागेपल्ली, आलापल्ली, अहेरीमार्गे पुन्हा प्राणहितामध्ये समारोपाला पोहोचली. संपूर्ण मार्गावर देशभक्तीपर घोषणांचा गजर, हातात फडकणारा तिरंगा आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे परिसर देशप्रेमाच्या रंगात रंगून गेला.

या रॅलीत द्वितीय कमान अधिकारी सुजीत कुमार, द्वितीय कमान अधिकारी (अभियान) शिव कुमार राव, उप कमांडंट अनिल चंद्रमोरे, सहायक कमांडंट राजू वाघ, तसेच वरिष्ठ चिकित्सकीय अधिकारी वरुण मिश्रा यांच्यासह ३७ व्या बटालियनचे जवान मोठ्या संख्येने सहभागी झाले. तिरंगा फडकावत, वाहनांच्या हेडलाइटमध्ये झळकणारे राष्ट्रीय ध्वजाचे रंग आणि सीआरपीएफ जवानांचा शिस्तबद्ध जल्लोष हा नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला.

रॅलीदरम्यान गावागावातून नागरिकांनी हातात तिरंगा घेऊन जवानांचे स्वागत केले. स्थानिक शाळकरी मुले, व्यापारी आणि ग्रामस्थ रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ या घोषणांनी वातावरण दुमदुमवले.

सीआरपीएफ ३७ व्या बटालियनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या उपक्रमाचा उद्देश स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक घरात तिरंगा पोहोचवणे, राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणे आणि युवकांना देशभक्तीच्या भावनेत सहभागी करून घेणे हा आहे. “तिरंगा हा केवळ कापडाचा तुकडा नसून, आपल्या बलिदान, संघर्ष आणि गौरवशाली इतिहासाचे प्रतीक आहे,” असे द्वितीय कमान अधिकारी सुजीत कुमार यांनी सांगितले.

अशा उपक्रमांमुळे केवळ देशभक्तीची भावना दृढ होत नाही, तर सुरक्षा दल आणि नागरिक यांच्यातील स्नेहबंध अधिक घट्ट होतात, असेही ते म्हणाले.