रक्षाबंधनच्या आधीच दादांची ‘लाडक्या बहीणा’ला भेट

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टलाच मिळणार

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 07 ऑगस्ट –  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 कोटींपेक्षा जास्त अर्ज शासन दरबारी प्राप्त झाले असून या अर्जाचा ओघ अद्यापही कायम आहे. कारण, राज्य सरकारने 15 ऑगस्टची मुदत वाढवून आता 31 ऑगस्टपर्यंत लाडक्या बहि‍णींना अर्ज करण्यासाठी मुभा दिली आहे. त्यामुळे, लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज केले जात आहेत. त्यातच, आता, लाडक्या बहि‍णींसाठी आणखी एक गुडन्यूज आली आहे. त्यानुसार, 17 ऑगस्ट रोजीच या योजनेचा पहिला हफ्ता 3000 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे, रक्षाबंधनापूर्वीच बहि‍णींना ओवाळणी मिळणार असल्याचे स्पष्ट झालं आहे.

ऑगस्ट महिन्याच्या येत्या १७ तारखेला लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता लाभार्थी महिलांना मिळणार आहे. यासंदर्भातील मोठा निर्णय हा आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. झालेल्या निर्णयानुसार येत्या १७ तारखेला लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. दरम्यान, अजित पवार यांनी रक्षाबंधनाच्या आधीच लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता खात्यात जमा होणार असा शब्द दिला होता. यानुसार आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे.

17 ऑगस्टला दोन ते अडीच कोटी महिलांना पहिला हप्ता देण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारचा विचार असल्याचीही माहिती आहे. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे योजनेसाठी पात्र झालेल्या महिला भगिनींना मोठा दिलासा मिळाला आहे.

तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर महिलांच्या आलेल्या अर्जांची आकडेवारी समोर येत आहेत. त्यामध्ये, महिला भगिनींचे मंजूर अर्ज, प्रलंबित अर्ज आणि नामंजूर अर्जही देण्यात येत आहेत. तर, प्रलिंबित अर्जांमधील काही त्रुटी दुरुस्त करुन ते मंजूर केले जाणार आहेत. तर, नामंजूर करण्यात आलेल्या अर्जांना पुन्हा नव्याने अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

giftLadki bahin yojanaRakshabandhan