दामरंचा बोललं… बंदुकीच्या जागी विश्वास

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली: माओवादी सप्ताहाच्या काळात जेव्हा जंगलात दहशतीचे सावट दाटलेले असते, तेव्हाच दामरंचा सारख्या अतिदुर्गम गावातील सामान्य नागरिकांनी अभूतपूर्व धाडस दाखवत माओवाद्यांच्या छायेला झुगारले आणि पोलीस दलाच्या स्वाधीन केल्या भरमार बंदुका. एकूण ३ नग भरमार आणि १ नग बंदुकीचे बॅरल पोलिसांच्या ताब्यात देऊन लोकांनी भीतीऐवजी बांधिलकी आणि हिंसाचाराऐवजी विश्वास यांची निवड केली.

गडचिरोली पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी कृती उपक्रमांतून पोलीस व नागरिक यांच्यात निर्माण झालेला सेतू, आता प्रत्यक्ष कृतीतून दिसून येतो आहे. दामरंचा उपपोस्टे हद्दीत झालेल्या या शस्त्रसुमर्पणामुळे माओवादी सप्ताहाचा प्रभाव फिका पडत असून, समाज मुख्य प्रवाहात येण्याचा निर्धार करत आहे.

गेल्या तीन वर्षांत एकूण १४५ पेक्षा अधिक भरमार बंदुका गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी स्वेच्छेने पोलिसांच्या हाती सुपूर्त केल्या आहेत. ही संख्या केवळ आकड्यांपुरती मर्यादित नसून, ही आहे लोकशाहीत पुनर्विश्वास प्रस्थापित होण्याची नोंद. सन २०२२ मध्ये ७३, २०२३ मध्ये ४६ आणि २०२४ मध्ये २६ बंदुका नागरिकांनी पोलिसांकडे दिल्या. या आकड्यांमागे एक नवा जनमताचा लाटाच उभी राहत आहे.

दामरंचा येथील पोउपनि. पृथ्वीराज बाराते, अनिकेत संकपाळ व त्यांच्या पथकाने प्रभावी जनसंपर्कातून नागरिकांमध्ये नवसंवेदना जागवली. ‘बंदूक हा मार्ग नाही, संवाद हाच खरा पर्याय’ हे सामान्य जनतेने आपल्या कृतीतून सिध्द केलं आहे.

या घटनेचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे कोरची येथील बाजारपेठ. मागील वीस वर्षांपासून नक्षल सप्ताहात बंद राहणारी ही बाजारपेठ यंदा खुले राहिली. माओवाद्यांच्या हिंसक इशाऱ्यांना थेट धुडकावून व्यापारी आणि नागरिकांनी व्यापार सुरू ठेवत नव्या धैर्याची नोंद केली.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी या नागरिकांच्या निर्णयाचे मन:पूर्वक कौतुक करत, गडचिरोली पोलिस दल नेहमीच जनतेच्या सोबत असल्याचा पुनरुच्चार केला. नागरी कृती उपक्रम, संवादाधारित संपर्क आणि विश्वासाच्या माध्यमातून माओवाद्यांच्या विरोधात उभी राहणारी ही जनतेची लाट म्हणजे गडचिरोलीच्या नवयुगाची सुरुवात आहे.