लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. ३१ जुलै (जिमाका): शैक्षणिक सत्र २०२५-२६ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून इतर मागासवर्ग (इमाव), विमुक्त जाती (विजाभज) आणि विशेष मागास प्रवर्गातील (विमाप्र) उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतीगृह योजनेचा लाभ घेण्यासाठी १७ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृहे, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत वेळेत अर्ज सादर करून जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक, डॉ. सचिन मडावी यांनी केले आहे.
वसतिगृह प्रवेश आणि विविध योजनांचा लाभ
इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत मुला-मुलींच्या वसतिगृहांमध्ये तसेच आधार व स्वयंम योजनेअंतर्गत १२ वी नंतरच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनांचा लाभ घेता येणार आहे. विशेषतः, बी.ए., बी.कॉम, बी.एस.सी. अशा १२ वी नंतरच्या पदवी अभ्यासक्रमांमध्ये आणि एम.ए., एम.एस.सी. अशा पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा.
अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा
शासकीय पोर्टल https://hmas.mahait.org वर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी १ ऑगस्ट २०२५ ते १७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत आपले अर्ज ऑनलाइन भरून, त्याची प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे संबंधित वसतिगृहांमध्ये विहित मुदतीत सादर करणे बंधनकारक आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
अधिक माहितीसाठी विद्यार्थी ओबीसी मुला-मुलींचे वसतिगृह, गडचिरोली येथील गृहपाल किंवा सहायक संचालक कार्यालय, सामाजिक न्याय भवन,आयटीआय चौक येथे संपर्क साधावा असे डॉ. सचिन मडावी यांनी कळविले आहे.