अनुकंपाधारक संघाचे जिल्हा कचेरीवर आमरण उपोषण, अनुकंपा धारकांना नोकरीत सामावून घेण्याची मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वाशीम दि, 25 जानेवारी: जिल्ह्यातील शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयातील व शिक्षण संस्थेतील अनुकंपा धारकांना शासनाच्या प्रचलित शासन निर्णयानुसार तात्काळ नोकरीत सामावून घेण्याच्या मागणीसाठी प्रदेशाध्यक्ष पंकज गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष किशोर अवचार यांच्या नेतृत्वात अनुकंपाधारक संघाच्यावतीने 24 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली.

शासन सेवेत रुजू असताना मयत झालेल्या कर्मचार्‍यांच्या एका वारसाला नोकरीत सामावून घेण्याचे शासनाचे धोरण आहे. मात्र, या धोरणाला प्रशासनाकडून हरताळ फासल्या जात असल्याने अनुकंपा पदभरती करण्यास दिरंगाई होत आहे. प्रचलित शासन निर्णयानुसार रिक्त पदांच्या वीस टक्के पदे अनुकंपाची भरणे आवश्यक असताना प्रशासन मात्र भरती करण्यास दिरंगाई करत आहे. नोकरीअभावी अनुकंपा धारकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून, होत असलेल्या दिरंगाईमुळे बरेच अनुकंपाधारक वयोमर्यादेतुन बाद झाले आहेत तर बरेच बाद होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. मात्र शासन याकडे कानाडोळा करत असल्याने या प्रश्‍नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनुकंपा पदभरती तात्काळ करण्याच्या मागणीसाठी अनुकंपाधारक संघाच्यावतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

उपोषणामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे दिनेश घनगाव, जिल्हा परिषदेचे निखिल मिसाळ, स्वप्निल केळे, राहुल खाडे, प्रीतम उलेमाले आदी अनुकंपाधारक आमरण उपोषणास बसले आहेत. उपोषणाला अभिजीत निंबेकर, योगेश राठोड, प्रफुल इंगोले, सतीश भेंडेकर, रवि गाडे, ठाकरे, इलियास खान, पुरुषोत्तम जाधव, भारत साबळे, बांगरे यांच्यासह जिल्ह्यातील शासकीय निमशासकीय कार्यालयातील अनुकंपाधारक यांनी पाठिंबा दिला आहे.