अबुझमाड सीमेलगत निर्णायक कारवाई : सात जहाल माओवादी ठार; ७१ लाखांचे बक्षीस घोषित आरोपींचा खात्मा

तीन दिवस चाललेल्या भीषण चकमकीत सी-६० व सीआरपीएफची संयुक्त मोहीम यशस्वी; एक जवान शहीद, एक जखमी..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात माओवादी चळवळ अबुझमाड परिसरापुरती मर्यादित होत असताना सुरक्षा दलांनी पुन्हा एकदा निर्णायक कारवाई करत सात जहाल माओवादी ठार केल्याने नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला आहे. गडचिरोली–नारायणपूर सीमेलगतच्या अतिदुर्गम जंगलात तीन दिवस आणि तीन रात्री चाललेल्या संयुक्त मोहिमेत गडचिरोली पोलीस दलाच्या सी-६० कमांडो पथकासह सीआरपीएफ जवानांनी ही कामगिरी बजावली. या कारवाईत डिकेएसझेडसीचा प्रभारी प्रभाकर उर्फ रवी उर्फ स्वामी याच्यासह विविध स्तरांवरील वरिष्ठ माओवादी नेत्यांचा खात्मा करण्यात आला असून त्यांच्यावर शासनाने एकत्रित ७१ लाख रुपयांचे बक्षीस घोषित केले होते.

या कारवाईदरम्यान माओवाद्यांनी केलेल्या जोरदार गोळीबारात विशेष अभियान पथकातील पोशि/५२२८ दीपक चिन्ना मडावी यांनी शौर्याने लढताना वीरमरण पत्करले, तर जवान जोगा मडावी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

गोपनीय माहितीवरून राबविण्यात आले धाडसी अभियान

गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी क्रमांक १० मधील उर्वरित माओवादी आणि छत्तीसगडमधील दलम सदस्य विध्वंसक कारवायांच्या तयारीत असल्याचे उघड झाले होते. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली ३ फेब्रुवारी रोजी विशेष अभियान पथकाच्या १४ तुकड्या तातडीने जंगल परिसरात रवाना करण्यात आल्या. अतिदुर्गम आणि प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीत जवानांनी मोठ्या धैर्याने मोहीम सुरू ठेवली.

४ फेब्रुवारी रोजी शोध मोहिमेदरम्यान दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला. जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत दोन माओवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. त्यानंतर ५ फेब्रुवारी रोजी अतिरिक्त चार तुकड्या व सीआरपीएफ क्यूएटी पथक मोहिमेत सहभागी करण्यात आले. या दिवशी झालेल्या चकमकीत तीन माओवादी ठार झाले आणि दोन अत्याधुनिक शस्त्रे हस्तगत करण्यात आली.

६ फेब्रुवारी रोजी पुन्हा झालेल्या चकमकीत आणखी चार माओवादी ठार करण्यात आले. एकूण तीन दिवस चाललेल्या या कठीण मोहिमेत सात माओवादी निष्प्रभ करण्यात सुरक्षा दलाला यश मिळाले.

शहीद जवानाला मानवंदना..

मोहिमेदरम्यान जखमी झालेल्या दीपक चिन्ना मडावी यांना हेलिकॉप्टरने बाहेर काढून भामरागड उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. ६ फेब्रुवारी रोजी गडचिरोली पोलीस मुख्यालयात त्यांना शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली.

ठार करण्यात आलेल्या माओवादी नेत्यांची माहिती..

१) प्रभाकर उर्फ रवी उर्फ स्वामी उर्फ लोकेती चंदरराव (वय ५७, तेलंगाणा) – डिकेएसझेडसी सदस्य व पश्चिम सब झोनल ब्युरो प्रभारी. याच्यावर २५ लाखांचे बक्षीस होते. ११३ हिंसक घटनांमध्ये सहभाग.

२) पागु मोडम (वय ३०, बिजापूर) – कंपनी क्र. ५ चा सिवायपीसी कमांडर. १६ लाखांचे बक्षीस.

३) अनिला उर्फ बुदरी कोवाची (वय २४, सुकमा) – पीपीसीएम सदस्य व प्रभाकरची अंगरक्षक. ८ लाखांचे बक्षीस.

४) कामेश पदा (वय ३५, सुकमा) – स्पेशल प्लाटून कमांडर. ८ लाखांचे बक्षीस.

५) भजनाथ उर्फ भिमा होळी (वय ४०, सुकमा) – एसीएम पदाधिकारी. ६ लाखांचे बक्षीस.

६) मंगली कुरसाम (पश्चिम बस्तर) – कंपनी क्र. १० सदस्य. ४ लाखांचे बक्षीस.

७) जोगी सोढी-मडावी (वय २७, बिजापूर) – कंपनी क्र. ५ सदस्य. ६ लाखांचे बक्षीस.

मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त…

कारवाईदरम्यान तीन एके-४७ रायफल, एक एसएलआर, एक .३०३ रायफल, १७३ जिवंत काडतुसे, तीन बीजीएल, सात मॅगझिन, कॉर्टेक्स वायर बंडल, जिलेटीन कांड्या तसेच मोठ्या प्रमाणावर माओवादी साहित्य जप्त करण्यात आले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त कारवाई…

ही मोहीम अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे, विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफ उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, कार्तिक मधीरा, गोकुल राज तसेच उपपोलीस अधीक्षक विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

नक्षलविरोधी मोहिमेला गती…

सन २०२१ पासून गडचिरोली पोलीसांच्या सातत्यपूर्ण कारवाईत आतापर्यंत ९९ कट्टर माओवादी ठार, १४० अटक आणि १५३ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी उर्वरित माओवाद्यांना हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केले असून जिल्ह्यात माओवादविरोधी मोहीम आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.

7Naxal kill by policeEra of naxalismGadchiroli police achivementNaxal endNaxal vs police
Comments (0)
Add Comment