हरिण मटन प्रकरणात ‘कुंपणच शेत खाते’; उपवनसंरक्षक दिपाली तलमले यांच्या धडाकेबाज कारवाईने विभागात खळबळ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : आलापल्ली येथे वन्यजीव संरक्षणाच्या जबाबदारीवर असलेल्या वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनीच हरिणाची शिकार करून त्याचे मटन शिजवून खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, उपवनसंरक्षक दिपाली तलमले यांनी या प्रकरणी त्वरित कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. एका बाजूला जंगलसंपत्ती व वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी शासन प्रचंड निधी खर्च करत असताना, दुसरीकडे त्याच संस्थेतील कर्मचारी वन्यजीवांची शिकारी करत असल्याचे उघडकीस येणे हे फक्त कायद्याचे उल्लंघन नसून व्यवस्थेतील नैतिकतेचाही मोठा अपमान आहे.

आलापल्ली एफडीसीएम विभागातील काही कर्मचाऱ्यांनी स्वतःच हरिण मारून त्याचे मटन शिजवून जेवणाचा आस्वाद घेतल्याची कबुली मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणात केवळ दोनच नव्हे, तर आणखी अनेक कर्मचार्‍यांचा सहभाग असल्याचे प्राथमिक माहितीवरून स्पष्ट होत आहे. सध्या दोष एका कनिष्ठ कंत्राटी कर्मचाऱ्यावर ढकलून इतर दोषींना वाचविण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशीही माहिती मिळत आहे. उपवनसंरक्षक दिपाली तलमले यांनी या गंभीर प्रकरणात कोणतीही गय न ठेवता जबाबदारीने आणि निर्भीडपणे कारवाई केल्यामुळे संपूर्ण विभागात खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे त्यांच्या पदभार ग्रहणानंतर गडचिरोली जिल्ह्यात वन्यजीव संरक्षण आणि तस्करीविरोधी मोहिमा अधिक गतीने आणि पारदर्शकतेने राबवल्या जात आहेत. त्यांच्या कारवाईनंतर वनविभागातील ढिसाळ कारभार, तस्करांचे जाळे आणि खाजगी लॉब्यांची भीती स्पष्टपणे जाणवू लागली आहे. त्यामुळे या प्रकरणातील ‘मोठे मासे’ कोण आणि त्यांच्या पाठीमागे कोणाचा वरदहस्त आहे याचा सखोल तपास होणे अत्यावश्यक आहे. वनविभागाने यासंदर्भात कठोर कारवाई करत दोषींवर कठोरात कठोर शिक्षा लावली नाही, तर अशा घटनांना चाप लागणार नाही, आणि वनसंपत्तीचं संरक्षण करण्याची संपूर्ण संकल्पना फक्त फाइलपुरतीच राहील.

एका हरिणाच्या मटनातून उघड झालेल्या या व्यवस्थात्मक विफलतेनंतर, दिपाली तलमले यांच्यासारख्या अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या जबाबदारीमुळेच अजूनही लोकांचा विश्वास टिकून आहे, आणि तो टिकवायचा असेल तर कारवाईचं गांभीर्य आता कागदापुरतं न ठेवता प्रत्यक्षात उतरवणं हीच काळाची गरज आहे.

Aheri forest departmentAnimals hauntinggadchiroli forestहरीण शिकार