लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, १६ जून : पावसाळ्याची चाहूल लागताच जंगल परिसरात वन्यजीवांची शिकार जोरात सुरू झाल्याचे समोर येत आहे. विशेषतः पहिल्या पावसानंतर शेतशिवारात घोरपडीसारखे प्राणी आश्रय घेतात आणि याचाच गैरफायदा घेत अवैध शिकारी सक्रिय झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर वनविभाग युद्धपातळीवर कारवाईस सज्ज झाला असून, शिकार करणाऱ्यांना कठोर कारावास व दंड भोगावा लागणार आहे, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
वन्यजीव कायद्यानुसार गुन्हा..
भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ नुसार घोरपड, हरीण, वाघ, सांबर, नीलगाय यांसारख्या प्राण्यांची शिकार करणे गंभीर गुन्हा आहे. यासाठी ७ वर्षांपर्यंत कारावास आणि मोठ्या दंडाची तरतूद आहे. त्यामुळे, शिकार करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करून अटक केली जाणार, असे वनविभागाने स्पष्ट केले आहे.
शहरी भागातही मटनसाठी मागणी..
गंभीर बाब म्हणजे फक्त ग्रामीणच नव्हे, तर शहरी भागातही ‘घोरपड मटन’साठी मागणी मोठ्या प्रमाणात असल्याचे उघड झाले आहे. काही भागांत गोपनीयपणे मांसाची देवाणघेवाण होत असून, स्थानिक लोकही यात सहभागी असल्याची माहिती मिळत आहे. काही ठिकाणी बहेलिया टोळीची हालचाल दिसून आल्याने विभाग अॅक्शन मोडमध्ये गेला आहे.
नागरिकांनी सतर्क राहावे..
जंगल व शेत परिसरात वाढलेली वन्यजीवांची हालचाल लक्षात घेता वनविभागाने नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही संशयास्पद हालचाल, शिकार किंवा मांस विक्रीची माहिती तत्काळ वनविभागाला कळवावी, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. “शिकार कराल तर तुरुंगात जाल!”, असा थेट इशाराच यानिमित्ताने देण्यात आला आहे.