लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर, दि. १३ : ब्रम्हपुरी उपविभागातील पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असून, त्यांच्या विरोधात झालेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर तातडीने निलंबन करण्यात यावे, अशी ठाम मागणी काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली.
लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून वडेट्टीवार यांनी सभागृहाचे लक्ष वेधताना सांगितले की, ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव हे नियमबाह्य पद्धतीने कारभार करत आहेत. रात्रीच्या गस्ती दरम्यान वाळूने भरलेला ट्रक दहा दिवस ताब्यात ठेवण्यात आला, मात्र ट्रक मालकाशी आर्थिक देवाणघेवाण झाल्यानंतर गुन्हा नोंदविण्याऐवजी तो ट्रक सोडून देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
ब्रम्हपुरी परिसरात वाळू तस्करी सर्रास सुरू असताना, संबंधित अधिकारी “माझे कोणी वाकडे करू शकत नाही” अशा भूमिकेत काम करत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. अशा प्रकारच्या वर्तणुकीमुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे सांगत, त्यांनी संबंधित अधिकाऱ्याचे तातडीने निलंबन करण्याची मागणी लावून धरली.
या मुद्द्यावर गृहराज्यमंत्री कारवाईबाबत स्पष्ट निर्देश देत नसल्याचा आक्षेप घेत, विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेच्या वेलमध्ये जाऊन कारवाईची मागणी केली. त्यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री यांनी सांगितले की, संबंधित पोलीस अधिकाऱ्याविरोधात विभागीय चौकशी सुरू असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.
यावर आक्षेप घेत वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले की, चौकशी सुरू असताना संबंधित अधिकारी त्याच पदावर कार्यरत राहिल्यास चौकशीवर परिणाम होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांना तत्काळ पदावरून हटवण्यात यावे. त्यानंतर गृहराज्यमंत्री यांनी सभागृहात उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांना तात्काळ त्यांच्या पदावरून हटवण्यात येईल, अशी घोषणा केली.