बेंबाळ प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात डेंगू, मलेरिया व इतर तापाची साथ.

अपुरे कर्मचारी व अपुऱ्या सोयी सुविधा यामुळे आरोग्य व्यवस्थेचे वाजले तीन तेरा.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुल, १७ ऑगस्ट :-  तालुक्यातील बेंबाळ या गावात व आजूबाजूच्या परिसरात डेंगू, मलेरिया व इतर तापाची साथ मोठ्या प्रमाणात असून घरोघरी तापाचे रुग्ण दिसून येत आहेत.

बेंबाळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून केवळ एका डॉक्टरवर व काही मोजक्याच कर्मचाऱ्यांवर संपूर्ण परिसरातील रुग्णांचा भार आहे.सदर प्राथमिक आरोग्य केंद्रावर एकूण २४ गावांचा भार असून जवळपास ३२ हजार लोकसंख्या या परिसरात आहे.

जिल्ह्यातील मोठे प्राथमिक आरोग्य केंद्र असून वर्षाला जवळपास १८००० ओपीडी होत असतात. ४७६ वार्षिक गरोदर मातांचे टारगेट असून नवेगाव मोरे पासूनचे रुग्ण या आरोग्य केंद्रात येत असतात. सर्वात जास्त जन्मदर व सर्वात तरुण परिसर म्हणून हा भाग ओळखल्या जाते. परंतु बालमृत्यूचे प्रमाणही या परिसरात जास्त असून सतरा वर्षापासून एकच रुग्णवाहिका या रुग्णालयात आहे. ANM, HA, लॅब टेक्निशियन, फार्मसीस्ट, परिचर, MPW, स्विपर अशा कर्मचाऱ्यांची आवश्यकता असतांना केवळ बोटावर मोजता येतील एवढ्या कर्मचाऱ्यांवर संपूर्ण परिसराचा भार आहे.

एवढे मोठे प्राथमिक आरोग्य केंद्र असून शासनाकडून केवळ एक लाख वार्षिक निधी मिळते जे लाईट बिल व इतर किरकोळ कामाला खर्च होतात. ड्रायव्हर व दोन ॲम्बुलन्सची गरज असतांना जुन्याच रुग्णवाहिकेने थातूरमातूर काम सुरू आहे.

मागच्या जिल्हा परिषद सदस्यांनी एकही रुग्णकल्याण समितीची बैठक घेतली नाही त्यामुळे किरकोळ वस्तू घेण्यासाठी व इतर आवश्यक संसाधने मिळू शकली नाही अशी तेथील कर्मचाऱ्यांपासून माहिती मिळाली. एकीकडे सरकार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करावयास सांगत आहे परंतु दुसरीकडे आरोग्यवस्थेचे तीन तेरा वाजवले आहेत.

आरोग्य व्यवस्था अपुरी असल्यामुळे या परिसरातील सर्वसामान्य जनतेला जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथे जावे लागते त्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून तात्काळ सदर रुग्णालयाला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्यावा तसेच कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून आरोग्य व्यवस्था चांगली करावी अशी मागणी गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत उराडे, किशोर पगडपल्लीवार, चांगदेव केमेकर, सिद्धार्थ भडके, प्रदीप फरकडे व अन्य गावकऱ्यांनी केली. जर आरोग्य प्रशासनाने वरील मागणी तात्काळ पूर्ण केली नाही तर याविरोधात परिसरातील संपूर्ण गावकरी मिळून तीव्र आंदोलन करतील असा इशारा प्रशांत उराडे, किशोर पगडपल्लीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.

हे देखील वाचा :- 

आजादी का अमृत महोत्सव अंधारात कोरची तालुक्याची व्यथा कोण समजून घेणार ?

ब्रह्मपुरीत वाघाच्या हल्ल्यात एक शेतकरी मृत्युमुखी तर दुसरा गंभीर जखमी !

Dengue MalariaPUC