संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे त्र्यंबकेश्वरमधून पंढरपूरकडे प्रस्थान

“पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय” चा गजर करत पंढरपूरच्या दिशेने पालखी सोहळ्यास प्रारंभ...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नाशिक दि. २० : दर वर्षीप्रमाणे यंदाही त्र्यंबकेश्वरमधून संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांच्या पालखीने आज आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने भक्तीमय वातावरणात प्रस्थान ठेवले. पहाटेच्या सुमारास पारंपारिक पूजा विधि झाल्यानंतर टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि हजारो वारकऱ्यांच्या उपस्थित पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली. यावेळी वारकऱ्यांच्या विठुरायाच्या जयघोषांनी त्र्यंबकनगरी दुमदुमुनी गेली होती.

पहाटे निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिरात पूजा विधी झाल्यानंतर पालखी सजवण्यात आली होती. सनई चौघडे आणि टाळ-मृदुंगाचा गजर, राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो वारकरी, त्यांच्या हातात असलेले भगवे ध्वज आणि “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय” चा गजर करत पंढरपूरच्या दिशेने पालखी सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. यावेळी पानाफुलांनी सजविलेल्या चांदीच्या रथामध्ये संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची मुर्ती व पादुका ठेवण्यात आल्या होत्या. तसेच रथास फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. महिलांनी डोक्यावर तुलसी पात्र घेऊन मृत्यू केले, तर काहींनी फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला.

तर रथाच्या पुढे मानाच्या संत निवृत्तिनाथ समाधी संस्थान, श्री. देहकुर महाराज दिंडी, श्री बेलापूरकर महाराज दिंडी, श्री. डावरे महाराज दिंडी यांच्या दिंड्या होत्या. तसेच रथाच्या मागे मानाच्या दिंड्या अतिशय शिस्तबद्ध रित्या सहभागी झाल्या होत्या. दुपारी तीन वाजेच्या सुमारास नाथांच्या मंदिरासमोरुन पालखीचे प्रस्थान झाले. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांच्या पालखीचा सर्वात लांब पल्ल्यांच्या पालखीमध्ये समावेश होतो. त्यामुळे या पालखीला विशेष महत्त्व आहे. याशिवाय संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे मोठे बंधू म्हणून देखील निवृत्तिनाथ महाराज यांचे वारकरी संप्रदायामध्ये एक वेगळे स्थान असल्याने या वारीत सहभाग घेण्यासाठी संपूर्ण राज्यातून वारकरी येत असतात.

आज निवृत्तिनाथ महाराजांची पालखी त्र्यंबकेश्वर येथून निघून दोन किलोमीटरवरील श्री पंचायत महानिर्वाण आखाडा, पेगलवाडी येथे मुक्कामी असणार आहे. याठिकाणी त्र्यंबकेश्वरचे भाविक व मंडळे या पालखीची भोजन व्यवस्था करतील. या वारीत हजारो वारकरी सहभागी झाले आहेत.

श्री बेलापूरकर महाराज दिंडीश्री. डावरे महाराज दिंडीश्री. देहकुर महाराज दिंडीसंत निवृत्तिनाथ समाधी संस्थानसंतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज