लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, २७ जून – “सत्तेवर येण्यासाठी घोषणा ठणाणतात, पण सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या पाठीवर विश्वासघाताचे वारच होतात!” — अशा शब्दांत काँग्रेसने राज्य शासनावर तिखट हल्ला चढवला आहे.
गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी राज्य शासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम देत इशारा दिला आहे की, “शेतकऱ्यांच्या खात्यात बोनसची रक्कम तात्काळ जमा करा, अन्यथा महामंडळाच्या कार्यालयाला टाळं ठोकण्याचा थेट निर्णय घेतला जाईल!”
निवडणुकीपूर्वी मोठमोठ्या घोषणा करून शेतकऱ्यांच्या पदरात आश्वासनांची फसवी फळं टाकणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी, आजच्या खरीप हंगामातही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
अनेक महिने उलटून गेले, खरीप हंगाम सुरू झाला, पावसाच्या आगमनाने शेतीच्या कामांना वेग आला; पण शासनाने जाहीर केलेला बोनस अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही.
“शेतीसाठी बी-बियाणे, मजुरी, यंत्रसामग्री यावर मोठा खर्च येतो. त्यात मागील हंगामात पूर, अवकाळी पाऊस आणि जंगली हत्तींच्या हल्ल्यामुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत आहेत. शासनाने बोनस जाहीर केला पण तो प्रत्यक्षात शून्य! हे म्हणजे दुहेरी फसवणूक,” असं ब्राह्मणवाडे म्हणाले.
शासनाने जर आठ दिवसांच्या आत बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली नाही, तर काँग्रेसकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि महामंडळ कार्यालयात टाळं ठोकण्याची कारवाई होईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.