पदाचा दुरूपयोग करणाऱ्या सभापतीला पदावरून हटवून कठोर कारवाई करण्याची वंचित बहुजन आघाडी ची मागणी

सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना धमकावणाऱ्या मुल पंचायत समिती सभापतीला माजी पालकमंत्री व जिल्हा परिषद अध्यक्ष यांचा आशीर्वाद.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपुर, दि. ६ जुलै : मुल पंचायत समितीचे सभापती चंदु मारगोनवार यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत बेंबाळ ग्रामपंचायतचे सरपंच यांना सरपंच पदावरून हटविले तसेच ग्रामविकास अधिकारी बेंबाळ यांना धमकीवजा पत्र पाठवून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. सदर पत्र समाज माध्यमात वायरल झाल्यावर आपले पद जाईल व राजकीय पतन होईल या भीतीने  सदर प्रकरण अंगलट येताच सभापती चंदू मारगोनवार यांनी माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरुनुले यांच्याकडे धाव घेतली. सुधीर मुनगंटीवार यांच्या आशीर्वादानेच संध्याताई गुरनुले यांनी सभापती यांच्या सोबत पत्रकार परिषद घेऊन तो मी नव्हेच अशी भाषा वापरत राजकीय व प्रशासकीय दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा उघड झालेला असून जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापती आपल्या पदाचा गैरवापर करतांना दिसत आहेत.

सदर पत्रात चंदू मारगोनवार यांनी बेंबाळ ग्रामपंचायतचे सर्व कामाचे बांधकाम मी सांगेन त्या ठेकेदाराला मिळाले पाहिजे. ज्या काही ई-निविदा ऑनलाइन केलेले आहेत त्यांना रद्द करून ते सर्व कामे मलाच मिळाले पाहिजे. जर तुम्ही माझे म्हणणे ऐकत नसेल तर मी तुमच्यावर कारवाई करेल अशा आशयाचे पत्र दिनांक ५/६/२०२१ ला ग्राम विकास अधिकारी यांना टपालाद्वारे पाठवले. दि. १८ जून २०२१ ला ग्रामपंचायत सदस्यांना हाताशी घेऊन सरपंचावर अविश्वास ठराव पारित केला. सरपंच व ग्रामसेवक आपल्याला किंमत देत नाही अशा भावनेतून सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर दबाव तयार करून आलेल्या निधीच्या कामाचे ठेके स्वतःलाच मिळावे या आकसेपोटी आपल्या पदाचा गैरवापर करून धमकीवजा पत्र पाठविले. चंदू मारगोनवार यांनी बऱ्याचदा फोन द्वारे मेसेज करून, फोन करून सरपंच व ग्रामसेवकाला धमकाविले असे सबळ पुरावे आमच्याकडे उपलब्ध झालेले आहेत. त्यांनी धमकावून दबाव आणण्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग सुद्धा  आमच्याकडे उपलब्ध आहेत. असे वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांनी सांगितले.

ही बाब अत्यंत गंभीर असून शासकीय कामकाजात हस्तक्षेप करणे, प्रशासकीय अधिकाऱ्यांना धमकावणे, पदाचा दुरुपयोग करणे या बाबी अंतर्गत पंचायत समिती सभापती चंदू मारगोनवार यांना पदावरून तात्काळ हटवून यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी कडून करण्यात येत आहे.

चंदू मारगोनवार माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे पदाधिकारी असल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापती आपल्या पदाचा गैरवापर करून राजकीय व प्रशासकीय दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून सदर पत्राची निष्पक्ष उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी आक्रमक भूमिका घेणार व पंचायत समिती मूल मध्ये घुसून गोंधळ घालणार तसेच तीव्र निदर्शने करणार असा इशारा वंचित बहुजन आघाडी द्वारा पत्रकार परिषदेत सांगितले.

पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ समन्वयक राजू झोडे, जिल्हा महासचिव जयदीप खोब्रागडे, तनुजा ताई रायपुरे, कविताताई गौरकर, संपत कोरडे, सुभाष थोरात, बंडूभाऊ ढेंगरे, अविंदाताई उके, पोर्णिमा जुनघरे, पुष्पलता कोटांगले, लताताई साव, कृष्णा पेरकावार, विष्णू चापळे, तेजराज भगत, राहुल गौरकार, रामजी जुनघरे तथा वंचित चे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हे देखील वाचा :

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी दीपक सिंगला

गडचिरोली जिल्ह्यात आज 18 कोरोनामुक्त, तर 24 नवीन कोरोना बाधित

दिलासादायक! Paytm कंपनीकडून वापरकर्त्यांसाठी खास सुविधा; त्वरित मिळेल ६० हजार रुपयांपर्यंत कर्ज

 

 

lead storyRaju Zode