अनुदान देतांंना फेरतपासणीबाबचा आदेश रद्द करण्याचं उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचं आश्वासन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. 9 डिसेंबर: विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा / तुकड्यांना 20% व 40% टप्पा अनुदान देतांंना पुन्हा फेरमूल्यांकनाची अट शासनाने घातली होती. ती रद्द करण्याचं आश्वासन मा. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आज आमदार कपिल पाटील आणि अमरावतीचे नवनिर्वाचित आमदार किरण सरनाईक यांना दिले.

दादांनी सांगितलं की, अशी अट घालण्याचा मंत्री मंडळाचा कोणताही निर्णय नाही. त्यामुळे अधिकार्यांंनी परस्पर ही अट घातली किंवा कसं हे तपासून आम्ही रद्द करू.

विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा / तुकड्यांच्या तपासणीबाबत शिक्षण विभागाने 1 डिसेंबर रोजी आदेश दिलेले आहेत. अनुदानासाठी होणारी दिरंगाई आणि वारंवार होणाऱ्या तपासण्या यामुळे शिक्षक मेटाकुटीला आलेले आहेत. पुन्हा तपासणी ही अनुदानाच्या प्रतिक्षेत असलेल्या शिक्षकांची क्रूर चेष्टा आहे. कृपया हे तपासणीचे आदेश रद्द करून प्रचलित धोरणानुसार अनुदान देण्याबाबत कार्यवाही व्हावी, यासाठी आमदार कपिल पाटील आणि आमदार विक्रम काळे यांनी कालच शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांची भेट घेतली होती.