लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मुलचेरा तालुक्यात डेंग्यूच्या साथीने थैमान घातले असून, या पार्श्वभूमीवर नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर यांनी येल्ला व काकरगट्टा गावांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. ग्रामपंचायत येल्लामध्ये झालेल्या बैठकीत त्यांनी स्थानिक कर्मचारी, अधिकारी यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करताना साथरोग नियंत्रणासाठी अधिक परिणामकारक उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले.
साथीचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक संचालक (हिवताप) डॉ. नयना धुपारे यांनी लगाम, शांतीग्राम, मरपल्ली या गावांना भेटी देत आरोग्य विभागाच्या कामकाजाची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधून ताप आला की त्वरित रक्त तपासणी करा, उपचार घेण्यास विलंब करू नका. सरकारी रुग्णालयांत सर्व उपचार मोफत उपलब्ध आहेत असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले.
गावोगावी तपासणी व धुरफवारणी…
आरोग्य विभागाने सद्यस्थितीत धुरफवारणी, तापरुग्णांचा कंटेनर सर्व्हे आणि रक्त तपासणी मोहिमा हाती घेतल्या आहेत. ग्रामस्थांनी यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे. “साथरोगावर केवळ आरोग्य यंत्रणा मात करू शकत नाही, गावकऱ्यांचा जागरूक सहभाग तेवढाच महत्त्वाचा आहे”, असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
आरोग्य विभागाने डेंग्यू व मलेरिया यांसारख्या कीटकजन्य आजारांना आळा घालण्यासाठी ग्रामस्थांना पुढील उपाय कठोरपणे पाळण्याचे आवाहन केले आहे :
१)आठवड्यातून एकदा घरातील सर्व पाण्याची भांडी रिकामी करून आतून स्वच्छ धुवून कोरडी करावीत.
२)रिकामी करता न येणाऱ्या पाण्याच्या भांड्यांमध्ये नियमितपणे आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत अळीनाशक द्रावण (टेमीफॉस) टाकण्यात यावे.
३)घरावरील तसेच घरातील सर्व पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकण ठेवणे बंधनकारक करावे.
४)जुने टायर्स, नारळाच्या करवंट्या, फुटक्या बाटल्या, प्लास्टिकच्या भांडी यांसारख्या पाणी साचणाऱ्या निरुपयोगी वस्तू घराभोवती साठू देऊ नयेत.
५)फुलदाण्या, कुलर्स, फ्रिजमध्ये साचलेले पाणी दोन-तीन दिवसांतून एकदा बदलणे आवश्यक आहे.
दुर्गम गडचिरोलीतील आरोग्यस्थितीची खिडकी..
येल्ला आणि काकरगट्टा या डोंगरदऱ्यांत वसलेल्या गावांमध्ये प्रशासनाचा शिरकाव कठीण असला तरी आरोग्य यंत्रणा प्रत्यक्ष भेटी देत आहे. मात्र, या प्रसंगाने दुर्गम भागातील आरोग्य सुविधांची मर्यादा व ग्रामस्थांची असुरक्षितता अधोरेखित केली आहे. तात्पुरत्या फवारण्या व मोहिमा अल्पकालीन उपाय ठरतात; कायमस्वरूपी तोडगा म्हणजे ग्रामीण भागात सक्षम आरोग्य पायाभूत सुविधा उभारणे हीच खरी गरज आहे….
डेंग्यूचा पाचवा बळी, आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर पण दुर्गम भागातील स्थितीचे भयावह दर्शन