लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आलापली येथील नागसेन बुद्ध विहार, संघमित्रा बुद्ध विहार आणि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तसेच आजूबाजूच्या गावालगत परिसरातून धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. सकाळी नऊ वाजता नागसेन विहाराचे अध्यक्ष मा. कोरडे साहेब यांच्या हस्ते धम्मध्वज फडकावण्यात आला आणि त्यानंतर लगेचच शहरात धम्म रॅलीने शांतता, बंधुता व करुणेचा संदेश संपूर्ण शहरात पोहोचविला. या रॅलीत महिला, युवक, उपासक व उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारून भारतीय समाजजीवनाला नवी दिशा दिली होती. तो दिवस अशोक विजयादशमी म्हणून ओळखला जातो. अस्पृश्यतेच्या अंधःकारातून बहुजन समाजाला मुक्त करून समानतेचा, स्वातंत्र्याचा आणि आत्मसन्मानाचा प्रकाश देणारा हा दिवस आजही समाजासाठी दीपस्तंभ ठरतो. कार्यक्रमात उपस्थितांनी बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञांचा सामूहिक उच्चार करून अंधश्रद्धा, जातिभेद, मूर्तिपूजा आणि कर्मकांड झुगारून शिक्षण, बंधुता आणि मानवतेच्या आधारावर जीवन जगण्याचा संकल्प केला.
बाबासाहेबांचा वारसा म्हणजे बुद्धांनी दिलेल्या अष्टांगिक मार्गाचा स्वीकार आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांची आचरणातून जोपासना, असा संदेश वक्त्यांनी दिला. आजच्या काळात वाढत्या विषमता, द्वेष आणि हिंसेच्या पार्श्वभूमीवर बुद्धधम्माच्या करुणामय शिकवणीची आवश्यकता अधिक तीव्रतेने भासते, असेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
धम्मध्वजाखाली एकत्र जमलेल्या कुटुंबांनी आपल्या मुलांच्या हातात बुद्धध्वज सोपवून समतेच्या वारशाशी त्यांना जोडण्याचा संकल्प केला. महिलांच्या डोळ्यांत समाधानाचे अश्रू होते तर युवकांच्या चेहऱ्यावर आत्मसन्मानाचे तेज झळकत होते. धम्मचक्र प्रवर्तन दिन आता केवळ धार्मिक स्मरणोत्सव न राहता सामाजिक स्वाभिमानाचा आणि आत्मसन्मानाचा विजय उत्सव बनला आहे.
अस्पृश्यतेच्या बेड्यांतून मुक्त होऊन समतेच्या दिशेने झालेली बहुजनांची वाटचाल या दिनामुळे अधिक तेजस्वी झाली आहे आणि प्रत्येक वर्षी हा उत्सव नवा उत्साह व नवा संकल्प घेऊन समाजाला प्रेरणा देतो.