लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आल्लापल्ली दि,१५ : गडचिरोली जिल्ह्यात दीर्घकाळ एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी मानले जाणारे आमदार धर्मराव बाबा आत्राम आणि माजी आमदार दीपक आत्राम यांच्या आल्लापल्ली येथील अनपेक्षित भेटीने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. दीपक आत्राम यांच्या निवासस्थानी झालेल्या या सौहार्दपूर्ण भेटीत दोन्ही नेत्यांनी परस्परांचे स्वागत करत स्नेहपूर्ण चर्चा केल्याचे समजते.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीला औपचारिक शिष्टाचारापेक्षा अधिक राजकीय महत्त्व असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. गेल्या दोन दशकांपासून दोघांमध्ये राहिलेल्या मतभेदांमुळे अशी भेट अशक्य वाटत असताना, अचानक दोन्ही नेते एका मंचावर दिसल्याने चर्चांना उधाण आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे आराखडे, काही महत्त्वाच्या जागांचे समीकरण आणि स्थानिक नेतृत्वातील बदलत्या घडामोडींवर या बैठकीत चर्चा झाली. विशेषतः आल्लापल्ली–वेलगुर जीप क्षेत्रातील सर्वसाधारण प्रवर्ग आरक्षणाचा मुद्दा या भेटीत केंद्रस्थानी राहिल्याचेही सांगितले जाते.
या भेटीमागे काही व्यापक राजकीय गणिते असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामध्ये महायुतीत असलेल्या धर्मराव आत्राम यांच्यातील अंतर्गत नाराजी, काँग्रेस-शिवसेना आघाडीचा वाढता प्रभाव आणि स्थानिक राजकारणात पर्यायी समीकरण निर्माण करण्याची शक्यता या मुद्द्यांचा समावेश असल्याचे निरीक्षकांचे म्हणणे आहे.
दोन्ही नेते एका व्यासपीठावर एकत्र आल्याने कोणत्या पक्षाचे किंवा गटाचे नुकसान किंवा फायद्याचे गणित बदलू शकते, याविषयीही चर्चा सुरू आहे. विशेषतः भाजपच्या स्थानिक संघटनांसाठी ही भेट नव्या आव्हानाची सुरुवात ठरू शकते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
या अनपेक्षित भेटीमुळे गडचिरोलीच्या राजकारणात नवीन घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही मैत्री निवडणूकपूर्व आघाडीत रुपांतरते का, की ही फक्त परिस्थितीजन्य भेट ठरते, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.