केंद्र सरकारच्या जनहितविरोधी धोरणा विरोधात २७ ला धरणे व रास्तारोको आंदोलन

भाजपविरोधी पक्ष आणि संघटनांनी सहभागी होण्याचे डाव्या लोकशाही आघाडीने केले आवाहन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली (१९ सप्टेंबर) : केंद्र सरकारने संमत केलेल्या तीन शेतकरीविरोधी कृषी कायद्यांच्या विरोधात मागील ९ महिन्यांपासून राजधानी नवी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून ते संपवण्याचा प्रयत्न मोदी सरकारद्वारा केला जात आहे. या आंदोलनकारी शेतकऱ्यांनी येत्या २७ सप्टेंबर रोजी “भारत बंद” ची हाक दिली आहे. त्यानुसार गडचिरोली येथे डाव्या लोकशाही आघाडीतर्फे केंद्र सरकारच्या जनहितविरोधी धोरणाविरोधात दुपारी १२.०० वाजता धरणे व रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे.

स्थानिक विश्रामगृहात याबाबत आयोजित डाव्या लोकशाही आघाडीच्या बैठकीला भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष, समाजवादी पार्टी, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी,आम आदमी पार्टी आणि रिपब्लिकन पक्ष सहभागी झाले होते.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ.महेश कोपूलवार होते. तर अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा गडचिरोली जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, माकपचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार, माकपचे जिल्हा सचिव काॅ देवराव चवळे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष इलियास खान, आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण सावसाकडे, रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष माणिकराव तुरे, शेकापचे जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा महासचिव हंसराज उंदिरवाडे, समाजवादीचे फैजान पटेल प्रामुख्याने उपस्थित होते.

शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे व मोदी सरकारच्या जनहितविरोधी, फ़ॅसिस्ट वाटचालीला लगाम घालण्यासाठी जिल्ह्यातील भाजपेत्तर पक्ष आणि संघटनांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन डाव्या लोकशाही आघाडीने या बैठकीदरम्यान केले आहे.