धम्माचे अनुशासन, सणांचा आत्मसात अर्थ — आलापल्लीत ‘वर्षावास’ प्रवचन मालिकेचे पाचवे पुष्प संपन्न

आलापल्ली येथील संघमित्रा बुद्ध विहार येथे सुरू असलेल्या वर्षावास धम्मप्रवचन मालिकेच्या पाचव्या पुष्पात ‘बौद्धांचे सण व मंगल दिन’ या विषयावर त्यांनी सखोल विचार मांडले...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

आलापल्ली दी,०५ ऑगस्ट : “बौद्ध धर्मात प्रत्येक पौर्णिमा म्हणजे मंगलदिनींचा अमृतसंवेदन प्रसंग असतो; उपोसथ शिलाचे पालन, आत्मसंयम आणि धम्मस्मरण हीच खरी बौद्ध परंपरेतील सणांची खरी ओळख आहे,” असे मार्गदर्शन सुप्रसिद्ध धम्मप्रवचनकार दादाजी फुलझेले यांनी केले. आलापल्ली येथील संघमित्रा बुद्ध विहार येथे सुरू असलेल्या वर्षावास धम्मप्रवचन मालिकेच्या पाचव्या पुष्पात ‘बौद्धांचे सण व मंगल दिन’ या विषयावर त्यांनी सखोल विचार मांडले.

कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस दीप, पुष्प व सुगंध अर्पणाने करण्यात आली. त्रिशरण, पंचशील, भीमस्मरण, भीमस्तुती आणि गाथांचे सामूहिक गायन झाले. इंदिरा करमे यांनी भावपूर्ण बुद्धगीत सादर करून वातावरण धम्ममय केले.

दादाजी फुलझेले यांनी आपल्या प्रवचनात स्पष्ट केले की, पौर्णिमा ही केवळ एक खगोलीय घटना नसून, ती भगवान बुद्धांच्या जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यांशी निगडित असून, प्रत्येक पौर्णिमा हे धम्मपालनाचे स्मरण आहे. त्यांनी सांगितले की, बौद्ध अनुयायांनी आपल्या सणांमध्ये मौजमजेपेक्षा आचारधर्मावर भर द्यावा. उपोसथ शील, ध्यान, प्रज्ञा यांचे जीवनात अनुकरण हेच खरी धम्मानुसार साजरी केलेली मंगलदिनींची पूर्तता होय.

तसेच, १४ एप्रिल – बाबासाहेबांचा जन्मदिन, बुद्ध पौर्णिमा, धम्मचक्र प्रवर्तन दिन, आषाढी पौर्णिमा यांसारखे दिवस केवळ सण न राहता धम्मप्रेरणा देणारे उज्ज्वल दिवस आहेत, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल दुर्योधन यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी नाश्ता दान नंदा घागरगुंडे परिवार यांच्याकडून करण्यात आला. प्रवचनकार, गीतगायिका, सूत्रसंचालक आणि दानकर्त्यांचा उमाजी गोवर्धन यांच्या हस्ते महापुरुषांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचे दान देऊन सन्मान करण्यात आला. सुनिल खोब्रागडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या वर्षावास प्रवचन मालिकेचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आलापल्ली, भारतीय बौद्ध महासभा – जिल्हा, तालुका व महिला शाखा, तसेच वंदना मैत्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

बौद्ध विहार अल्लापल्ली